ANI
मुंबई

रेल्वेच्या दिव्यांग डब्यात १० महिन्यात ८ हजार ८१९ प्रवाशांची घुसखोरी

जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यात प्रशासनाने तब्बल ८ हजार ८१९ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली असून याद्वारे २९ लाखांहून अधिक दंड वसूल केला

देवांग भागवत

कोरोनानंतर उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये रेल्वेच्या दिव्यांग डब्यात प्रवाशांच्या वाढत्या घुसखोरीमुळे दिव्यांग प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यात प्रशासनाने तब्बल ८ हजार ८१९ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली असून याद्वारे २९ लाखांहून अधिक दंड वसूल केला असल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

रेल्वेमधील महिला आणि दिव्यांग डब्यात इतर प्रवाशांनी प्रवास करणे नियमबाह्य आहे. अशातच दिव्यांग डब्यात साधारण प्रवाशांनी अथवा मालवाहतूक करण्यास परवानगी नसतानाही मागील अनेक महिन्यांपासून या डब्यात इतर प्रवाशांची घुसखोरी वाढत आहे. दिव्यांग प्रवाशांकडून अशा घुसखोरांना रोखण्यात येते मात्र उद्धटपणे बोलत गर्दीचे कारण देत प्रवासी दिव्यांग डब्यातून राजरोसपणे प्रवास करतात. ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वर्षभरापासून अशा प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा दल व तिकीट तपासणीसांकडून विशेष मोहीमद्वारे कारवाई केली जात आहे. जानेवरी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये ८ हजार ८१९ घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईतून २९ लाख ७२ हजार ९४३ रुपये दंड वसुल करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, २०२१ या वर्षात १ हजार ४२९ घुसखोरांवर कारवाई करण्यात आली तर ३ लाख ९० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

अपंग प्रवासी आणि मध्य रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे कारवाईत यश

रेल्वे सुरक्षा दलाकडून दिव्यांग डब्यात होणाऱ्या घुसखोरीविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईवेळी अनेक अडचणी येत होत्या. यावर मार्ग म्हणून अपंग प्रवासी आणि मध्य रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांनी मिळून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप २०२० मध्ये तयार करण्यात आला. याद्वारे लोकल डब्यात घुसखोरी करणाऱ्यांचा फोटो, स्थानक इत्यादी माहिती पाठवल्यास या गटात असलेले रेल्वे सुरक्षा कर्मचारी संबंधित स्थानकातील सुरक्षा दल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात व कारवाई करण्यात येते. या व्हॉटसअ‍ॅप गटात दिव्यांग प्रवासी सदस्य आहेत. या ग्रुपद्वारे होणाऱ्या संवादातून कारवाई तात्काळ आणि यशस्वीपणे करण्यात येत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी