मुंबई

बाप्पाच्या आगमनात खड्डे, पाणी गळतीचे विघ्न; दिवसभरात ७० हून अधिक गणरायांचे आगमन

सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले. खड्ड्यांचे विघ्न, असमतोल रस्ते, पुलावरून होणारी पाणी गळती यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला.

Swapnil S

मुंबई : सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले. खड्ड्यांचे विघ्न, असमतोल रस्ते, पुलावरून होणारी पाणी गळती यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परळ परिसरात दिवसभर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील सुबक, आकर्षक, २५ फूट उंच अशा लाडक्या गणरायाचे रविवारी ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. अंधेरीचा कैवारी, माझगावचा मोरया, परळचा विघ्नहर्ता, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर, करी रोडचा कैवारी, चिरा बाजारचा इच्छापूर्ती अशा ७० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत दिवसभरात गणरायाचे आगमन झाले. लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी परळ वर्क शॉप रस्त्यावर भक्तांनी गर्दी केली होती. दरम्यान, बाप्पाच्या आगमनात रस्त्यावरील खड्डे, असमतोल रस्ते, पुलावरून पाणी गळतीचे विघ्न असून ते लवकर दूर करावे, अशी मागणी पालिकेसह संबंधित यंत्रणांना केल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहिबावकर यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई पालिका, पोलीस, संबंधित यंत्रणांकडून सहकार्य मिळते आणि पुढे मिळत राहील, असा विश्वास दहिबावकर यांनी व्यक्त केला.

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मंडपाच्या सजावटीसाठी १५ ते २० दिवस आधीच गणरायाचे आगमन होते. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून रविवार, २५ ऑगस्ट रोजी ७० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत विघ्नहर्त्या बाप्पाचे आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, या जयघोषांनी परळ वर्कशॉप परिसरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते. तर पुढील शनिवार, ३१ ऑगस्ट व रविवार, १ सप्टेंबर रोजी बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी बाप्पाच्या आगमनातील विघ्न दूर करा, अशी मागणी केल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.

लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा विनाअडथळा पार पडावा यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अमित कोकाटे, आशिष नरे, ऋषिकेश वाव्हळ, यशेष पटेल, शुभम जाधव, निखिल गावंड, पराग हतीम, गणेश गुप्ता, भूषण मढव या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे सांगत दहिबावकर यांनी त्यांचे आभार मानले.

या मंडळांतील बाप्पांचे आगमन

अंधेरीचा कैवारी, गोरेगावचा राजा, माझगावचा मोरया, हिमालयचा सम्राट, परळचा विघ्नहर्ता, संजय नगरचा विघ्नहर्ता, चेंबूरचा राजकुमार, मुंबईचा महागणपती, क्रांतिनगरचा महाराजा, सीबीडीचा राजा, करी रोडचा कैवारी, चिरा बाजारचा इच्छापूर्ती, आंबेवाडीचा राजा, हुकमिल लेनचा राजा, सीबीडीचा चिंतामणी, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर, उपनगराचा लिटिल मास्टर, मालाडचा राजा, तकियावार्डचा राजा, कृष्ण नगरचा राजा, रावल नगरचा राजा, मरीन ड्राईव्हचा सम्राट, मुंबादेवीचा गणराज, लोअर परळचा लाडका, डोंगरीचा राजा, मालाडचा मोरेश्वर, बाप्पा खेतवाडीचा, परळचा सम्राट, पोयसरचा राजा, ॲन्टॉप हिलचा महाराजा, अंधेरीचा महागणपती, मुंबईचा एकटा राजा, लेबर कॅम्पचा लाडका, वाशीचा विघ्नेश्वर, शास्त्री नगरचा महाराजा, अंधेरीच्या गणेशमूर्ती नगरचा महाराजा, धारावीचा श्रीपत यासह मुंबईतील ७० हून अधिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे रविवारी आगमन झाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी