मुंबई

सध्या देशातील वातावरण पाहता अघोषित आणीबाणी सुरू; उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट मत

प्रतिनिधी

सध्या देशातील वातावरण पाहता अघोषित आणीबाणी सुरू आहे की काय, असे वाटत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वृत्तपत्र लेखक चळवळीच्या तसेच ‘नवशक्ति’च्या जनमनाचा कानोसा (जमका) अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मातोश्री येथे कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेना नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, आमदार नितीन बानुगडे पाटील, आमदार रवींद्र वायकर, चंद्रकांत वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनील कुवरे आणि दिलीप सावंत यांना यंदाचा जीवनगौरव, तर नवशक्तिचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि वृत्तमानसचे सहसंपादक सुनील रमेश शिंदे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजन देसाई यांनी संपादित केलेल्या ‘शिवसेना आणि मराठी माणूस’ हे वृत्तपत्र लेखकांनी व्यक्त केलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

“सध्याचे देशभरचे वातावरण पाहता अघोषित आणीबाणी आहे की काय, अशी परिस्थिती आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली होती; परंतु ती घोषित आणीबाणी होती. शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा दिला होता, तरी मार्मिकसह सर्व वर्तमानपत्रांवर आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने होती. आजच्या प्राप्त परिस्थितीत मतस्वातंत्र्य मानणाऱ्यांची मग ती प्रिंट मीडिया असो वा अलीकडच्या सोशल मीडियावर तत्काळ व्यक्त होणे असो. यांची जबाबदारी वाढली आहे. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आणि तुम्ही जुनी जाणती; परंतु समाजातील जागती मंडळी आज माझ्यासमोर आहात. बाळासाहेब मला नेहमी सांगायचे लोकांना काय पाहिजे हे समजण्यासाठी एकवेळ तू अग्रलेख वाचू नकोस; परंतु सामान्य माणसांचा आवाज असलेली वाचकांची पत्रे जरूर वाच. तुमच्या जागेची अडचण आहे, तेव्हा हे जागल्यांचे व्यासपीठ अबाधित ठेवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबीयांना पत्रकारितेसह कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्त्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ते कधीही बोथट होऊ देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम