भारतीय रेल्वेने डिजिटल तिकीट प्रणालीत महत्त्वाचा बदल करत १ मार्चपासून 'युटीएस' (UTS - Unreserved Ticketing System) ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षित व अनारक्षित तिकीट, लोकल ट्रेन तिकीट तसेच सीझन पास बुकिंगसाठी 'रेलवन' (RailOne) हेच एकमेव अधिकृत ॲप असणार आहे. येत्या दोन दिवसांनंतर डिजिटल पद्धतीने तिकीट बुकिंग करणाऱ्या लाखो प्रवाशांना RailOne ॲपचा वापर करणे अनिवार्य होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, तिकीट बुकिंग प्रणाली अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. UTS ॲपमधील सर्व सेवा आता RailOne ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
RailOne ॲप कसे सुरु कराल?
प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून रेल्वेने RailOne सुरु करण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.
१) App Store किंवा Play Storeवरून RailOne ॲप डाउनलोड करा.
२) UTS किंवा IRCTC ॲपवर आधीपासून नोंदणी असेल तर त्याच युजरनेम आणि पासवर्डने लॉग-इन करा. नवीन युजर्स मोबाईल नंबर किंवा ई-मेलद्वारे नोंदणी करू शकतात.
३) पासवर्ड लक्षात नसेल तर Forgot Password पर्याय निवडा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर युजरनेम पाठवला जाईल आणि त्यानंतर OTPद्वारे नवीन पासवर्ड सेट करता येईल.
४) लॉग-इन केल्यानंतर My Bookings टॅबमध्ये युजर्सना सीझन पास किंवा तिकिट पाहता येईल.
R-Wallet आणि सीझन पास आपोआप ट्रान्सफर
UTS ॲपच्या R-Walletमधील शिल्लक रक्कम आणि चालू सीझन पास RailOne ॲपमध्ये आपोआप ट्रान्सफर होतील. त्यामुळे प्रवाशांना नवीन अकाउंट तयार करण्याची गरज लागणार नाही. नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग-इन केल्यास वॉलेटमधील रक्कम RailOneवर दिसेल आणि तिकीट बुकिंगसाठी वापरता येईल.
ज्यांच्याकडे आधीच UTS ॲपवरील पास आहेत, ते पास संपेपर्यंत वैध राहतील. मात्र, पुढील नूतनीकरण किंवा नवीन बुकिंगसाठी RailOne ॲप वापरणे अनिवार्य असेल.
सवलत आणि कॅशबॅकची ऑफर
RailOne ॲपचा वापर वाढवण्यासाठी रेल्वेने विशेष ऑफर जाहीर केली आहे. RailOneद्वारे तिकीट बुकिंग केल्यास ३ टक्के सवलत मिळेल. तसेच BHIM UPIद्वारे पेमेंट केल्यास ₹२० पर्यंत अतिरिक्त कॅशबॅकही दिला जाणार आहे.
सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपमध्ये
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ॲपचे लोकार्पण केले होते. या ॲपमध्ये अनारक्षित आणि आरक्षित तिकिट बुकिंग, लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग, प्लॅटफॉर्म माहिती, Rail Madad तक्रार नोंदणी, फूड ऑर्डर सेवा आणि रिफंड रिक्वेस्ट अशा सुविधा उपलब्ध आहेत. UTS ॲप बंद होणार असले तरी IRCTC ॲप पूर्वीप्रमाणे कार्यरत राहणार आहे.
Mumbai One नव्हे, RailOneच अधिकृत रेल्वे ॲप
UTS ॲपच्या जागी RailOne ॲप येणार असून Mumbai One ॲपशी त्याचा संबंध नाही.
RailOne : भारतीय रेल्वे सेवा (लोकल ट्रेन, आरक्षित/अनारक्षित तिकिटे, सीझन पास)
Mumbai One : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा (मेट्रो, बस, मोनोरेल)
मात्र, Mumbai One ॲपमध्ये रेल्वे सीझन पासची सुविधा उपलब्ध नाही.