पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे संवर्धन करणे गरजेचे असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या फांद्या कापण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केल्याचे भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
मुंबईसारख्या प्रदूषणाच्या शहरात अधिकाधिक वडाची झाडे लावली पाहिजेत व वाचवली पाहिजेत. यासाठी यंदाच्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून मुंबईत वडाच्या फांद्या कापण्यास बंदी घालावी. तसेच ज्याप्रमाणे होळीनिमित्त झाडे आणि फांद्या कापण्यास पालिका बंदी घालते व नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याच धर्तीवर वडाच्या फांद्या कापल्यासही कारवाई करण्याबाबत पालिकेने निर्णय घ्यावा, अशी मागणी बृह्न्मुंबुई महापालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
येत्या १४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाच्या फांद्याचा बाजारात अक्षरशः खच पडलेला असतो. अनेक घरांमध्ये या फांद्या आणून पूजन केले जाते. यावरून असे स्पष्ट दिसते की, विक्रेते हजारो, लाखो वडाच्या फांद्या कापून त्या बाजारात विक्रीसाठी आणतात. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी या सर्व फांद्या कचऱ्यात, गटारात, रस्त्यावर फेकून दिलेल्या आढळतात. वड हे वृक्ष संस्थेतील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे झाड आहे. वडाची मुळं, पारंब्या जमिनीत खोलवर जातात. एक वड शेकडो वर्षे जगतो. त्यामुळे या झाडाला कुटुंब संस्थेचे प्रतीक मानले जाते, असे शिंदे म्हणाले.