मुंबई : पार्किंगची सुविधा, मेट्रो कनेक्टीविटी सरकते जिने अशा सोयीसुविधासह जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबरपर्यंत प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष सुरुवातीला फलाट क्रमांक २ येथून राजस्थान-गुजरात प्रवास करता येणार आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी या कमाची रविवारी पाहणी केली. दरम्यान, जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसवरून गावाला जाण्याचे जोगेश्वरीकारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास वायकर यांनी व्यक्त केला.
अमृत भारत या योजनेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे स्टेशनचे काम करण्यात येत आहे. जोगेश्वरी येथे रेल्वेची जागा उपलब्ध असल्याने येथे टर्मिनस बनवण्यात यावे अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत केली होती. याप्रश्नी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. खासदार यांची मागणी मान्य करीत जोगेश्वरी टर्मिनसच्या उभारणीचे काम रेल्वेने सुरू केले आहे.
या ठिकाणी एकूण ३ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. येथे लिफ्ट, सरकते जिने, अंडरग्राऊंड पार्किंगची सुविधा, सोलर, मेट्रोची कनेक्टीव्हिटी, पूल करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी मल्टीमोडेल कनेक्टीव्हिटी सुविधाही करण्यात यावी अशी सूचना खासदार वायकर यांनी यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली. या टर्मिनसचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या टर्मिनसवरून कोकणात जाण्यासाठी गाड्या सोडण्यात येणार असल्याचे खासदार वायकर यांनी यावेळी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. आर्या, अमित गायकवाड, विवेक कुमार, नरसिंगराव, अमित खरवंदे, अशोक मालविया, मनपाच्या पी दक्षिण कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त पाटणे, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक सदानंद परब, स्वप्नील टेंबवलकर, साधना माने, रेखा रामवंशी, प्रियांका आंबोलकर, अशोक चाचे, जितेंद्र जनावळे, मिलिद कापडी, पूनम वैद्य, भाई मिर्लेकर, स्मिता बावधने, अमित पिळणकर, शिवसेनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.