मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाईंदर उत्तन येथील केशव सृष्टीमध्ये सहल नेली जाणार आहे. ही सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. तर काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, बोधात्मक, भावनात्मक, क्रियात्मक असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केशव सृष्टी येथे पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमध्ये ३० हजार ७१४ एवढे विद्यार्थी सहभाग होणार आहेत. मात्र या सहलीबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या केशव सृष्टीमध्ये सहल काढली जाणार ते ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून तयार करण्यात आले आहे. येथे भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते. त्यामुळे हे ठिकाणी योग्य नसून ही सर रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
“या सहलीची कसली पोटदुखी, हे समजत नाही. केशव सृष्टीचा उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेशी न करता तेथे चालणाऱ्या उपक्रमाची जाऊन माहिती घ्यावी. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पर्यावरण विषयक माहिती मिळणार आहे. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण भ्रमण, कचरा व्यवस्थापन, किचन वेस्ट बायोगॅस, गोबर गॅस, गांडूळ खत निर्मिती, पेपर रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकल, जल व्यवस्थापन, या विषयाचा अंतर्भाव असलेली माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या सहली पेक्षा खर्चही दुपटीपेक्षा कमी आहे. त्यामुळे जे विरोध करतायेत त्यांचा हेतू काय, त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांना सहल आयोजित करण्याचे कंत्राट मिळाले नाही म्हणून तर हा विरोध नाही ना,” असा सवाल भाजप नगरसेवक पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला आहे.
काँग्रेस या प्रस्तावाचा तीव्र विरोध करते, ज्याअंतर्गत ३०,७१४ पालिका शाळांमधील इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहलीच्या नावाखाली भाईंदर येथील केशव सृष्टी येथे नेण्यासाठी सुमारे २.४६ कोटी जनतेचा पैसा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. केशव सृष्टीचा संबंध आरआरएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीशी जोडलेला आहे. त्याच परिसरात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्था असून, त्या सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. हे इयत्ता ७ वीतील विद्यार्थी आहेत, जे त्यांच्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील वयात आहेत. त्यांना शिकण्याची, निसर्ग समजून घेण्याची, वैज्ञानिक जिज्ञासा विकसित करण्याची, खेळण्याची आणि आपले बालपण आनंदाने जगण्याची संधी मिळायला हवी. पर्यावरण शिक्षणाच्या नावाखाली सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांमधून येणाऱ्या पालिकेच्या मुलांना एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणीशी संबंधित संस्थात्मक वातावरणात नेणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी केली आहे.