मुंबई : ताडदेव येथील बेलासिस ब्रिजच्या बांधकामामुळे कोळी महिलांच्या व्यवसायांवर पालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी बुलडोझर फिरवला. या निषेधार्थ बुधवारी कोळी महिलांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून महिलांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली. यावर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या मच्छीविक्रेत्या महिलांचे ताडदेव येथील महानगर पालिकेच्या बाजार इमारतीत स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली.
बेलासिस ब्रीज येथे सहा दशकांपासून मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांच्या मासळी विक्री गाळ्यांवर महापालिकेने तोडक कारवाई केल्याने कोळी महिलांच्या मासळी साठवण्याच्या सामग्रीचे मोठे नुकसान झाले.
परवानाधारक महिलांचीही मासळी पालिकेने फेकून दिल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे मच्छिमार समाजामध्ये नाराजी पसरली.
दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मच्छिमारांकडून करण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाने घडलेल्या घटनेचा पंचनामा करून मासळी विक्रेत्या कोळी महिलांचे झालेले आर्थिक नुकसानीची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणीही यावेळी केली.
दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी
नोटीस न बजावता करण्यात आलेली कार्यवाही कायद्याला धरून नसल्याने दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. मच्छीमार महिलांबरोबर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी त्यांना परवाने देण्यात यावेत, अशी मागणी मच्छिमार संघटनेने आयुक्तांकडे केली. यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्देश देत या महिलांचे पुनर्वसन पालिकेच्या बाजार समिती इमारतीत केले जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती तांडेल यांनी दिली.