मुंबई

कुणाल कामराच्या अटकेची गरजच काय? हायकोर्टाचा सवाल, कामराला तूर्तास दिलासा, राज्य सरकारला चपराक

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीतामुळे वादात सापडलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला बुधवारी मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीतामुळे वादात सापडलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला बुधवारी मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ‘कामराला अटक करून चौकशी करण्याची गरज काय? त्याच्या जीवाला धोका असताना चौकशीला त्याने स्वत: उपस्थित राहण्याची गरजच काय ? त्याच्या सुरक्षेची काळजी घेणार का? कामराचे जबाब घेण्याची गरज आहे का? असे सवाल करीत हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलीच चपराक दिली

कुणाल कामराने गद्दार गीत गायल्यामुळे वादाला तोंड फुटले. त्या गीतानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले.आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे कामराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुणालने मद्रास उच्च न्यायालयाकडून ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. त्या जामिनाची मुदत सोमवारी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर दोन तास सुनावणी झाली. यावेळी कुणालच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवाई यांनी युक्तीवाद करताना राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. सत्तेचा गैरवापर करून कुणालविरोधात सूडबुध्दीने कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली. परंतु, त्याने तातडीने त्याला उत्तर देऊन पुढील तारीख देण्याची विनंती केली. कुणालला सध्या शिवसेना शिंदे गटाकडून धमक्या येत असून त्याच्या जीवाला धोका आहे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच गुन्हे संविधानाच्या अनुच्छेद १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे आणि अनुच्छेद २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला.

कामराच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला

पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने बुधवारी निर्णय राखून ठेवला. निर्णय होईपर्यंत कामराला अटक करू नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य