मुंबई

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

पाडकामासाठी इमारतीवर क्रेनच्या मदतीने जेसीबी उचलत असताना अचानक एका बाजूला कलंडून क्रेन चार ते पाच झोपड्यांवर कोसळली...

Mayuri Gawade

मुंबई : कुर्ल्यातील दाट लोकवस्तीच्या कुरेशी नगर परिसरात शुक्रवारी (दि.२१) पहाटे मोठी दुर्घटना घडली. पाडकाम सुरू असलेल्या ठिकाणी उभी करण्यात आलेली मोठी हायड्रॉलिक क्रेन अचानक एका बाजूला कलंडून लगतच्या झोपड्या, संरक्षक भिंत आणि वाहनांवर कोसळली. या दुर्घटनेत अवघ्या ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील मऊ आणि चिखलयुक्त जमिनीमुळे क्रेनची स्थिरता बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

क्रेनच्या मदतीने जेसीबी उचलत असतानाच...

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी नगर परिसरातील तळमजला अधिक १७ मजली बांधकामाधीन इमारतीच्या ठिकाणी पाडकाम सुरू होते. हे काम मेसर्स सनी कंपनीकडून केले जात होते. यावेळी जेसीबी इमारतीच्या वरच्या भागात उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येत होता. यादरम्यान क्रेनचा काही भाग अचानक कोसळला आणि क्रेन कुरेशी नगरमधील झोपड्यांवर पडली. तसेच सम्राट अशोक नगरमधील रस्ता, म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत आणि आवारात उभ्या असलेल्या ३ ते ४ वाहनांनाही या दुर्घटनेचा फटका बसला.

३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी

या दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झाले असून, त्यामध्ये अवघ्या ३ महिन्यांच्या बाळासह १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. शीव (सायन) रुग्णालयात जगरुल्ला नबी मोहम्मद खान (६३), अहमद नियाज अहमद (३ महिने), अतिकूर रहमान (६०), हकूम शेख (३६), नुमान खान (२१), रहमान खान (१९), सूरज गौर (१०) आणि अकबर (४०) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर राजू गौड (३५) आणि आरती गौड (३०) यांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व १० जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

मऊ आणि चिखलयुक्त जमिनीमुळे दुर्घटना?

एमएमआरडीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळावरील जमीन मऊ आणि चिखलयुक्त असल्याने क्रेनच्या स्थिरतेवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. क्रेन एका बाजूला कलंडून लगतच्या भागावर कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

क्रेनचा भाग रेल्वेच्या विद्युत तारांवर

कोसळलेल्या क्रेनचा भाग जवळून जाणाऱ्या कुर्ला-ट्रॉम्बे मालवाहतूक रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड विद्युत तारांच्या संपर्कात आला. मात्र, हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी वापरला जात असल्याने नियमित प्रवासी आणि लोकल रेल्वे सेवांवर या दुर्घटनेचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी

दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कोसळलेली क्रेन हटवण्यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये; तुषार गांधी यांची माहिती