मुंबई : विकेंडसाठी अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता गोवा आणि केरळप्रमाणे स्थानिक प्रवासासाठी मोटारसायकल व स्कूटर भाड्याने घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या किनारी शहरातील दोन ऑपरेटर्सना राज्य परिवहन विभागाने अधिकृत परवाने दिले असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्टमध्ये ‘रेन्ट अ मोटरसायकल स्कीम, १९९७’ अंतर्गत दोन परवाने मंजूर केले. या योजनेनुसार नोंदणीकृत ऑपरेटरना ठराविक नियम व सुरक्षितता मानके पूर्ण केल्यानंतर तासावर किंवा दिवसावर दुचाकी पर्यटकांना व अल्पकालीन वापरकर्त्यांना भाड्याने देता येतात.
ही योजना १९९७ मध्ये सुरू झाली होती. पहिल्या दहा वर्षांत काही परवाने दिल्यानंतर, महाबळेश्वरमध्ये टॅक्सी व रिक्षाचालकांच्या विरोधामुळे सरकारने २०१५ मध्ये ही योजना स्थगित केली होती. मात्र, यावर्षी जूनमध्ये राज्य सरकारने नऊ वर्षांचा निर्बंध उठवला आणि पुन्हा या योजनेला मार्ग मोकळा करून दिला.