मुंबई

Mumbai : राणीच्या बागेत सिंहाचे आगमन धूसर; पर्यायी प्राणी नसल्याने सिंह दर्शनाला पर्यटक मुकणार

गुजरात प्रशासनाची प्राण्याच्याऐवजी प्राणी देण्याची अट आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडे सिंहाच्या बदल्यात देण्यासाठी अन्य प्राणी नसल्यामुळे यंदाच्या वर्षीही पर्यटकांना सिंह पाहायला मिळणार नाही.

Swapnil S

पूनम पोळ/ मुंबई

गेल्या काही वर्षांत राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे राणी बागेत पर्यटकांकडून होणाऱ्या महसुलात मागील दोन वर्षांत वाढ झाली आहे. दरम्यान, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने राणी बागेत सिंह आणि अन्य काही प्राणी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुजरात प्रशासनाची प्राण्याच्याऐवजी प्राणी देण्याची अट आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडे सिंहाच्या बदल्यात देण्यासाठी अन्य प्राणी नसल्यामुळे यंदाच्या वर्षीही पर्यटकांना सिंह पाहायला मिळणार नाही.

राणी बागेत वाढत्या पर्यटकसंख्येमुळे गेल्या दोन वर्षांत महसुलात वाढ झाल्याचे समोर आले आहे. पर्यटकांच्या गर्दीत वाढ होण्यासाठी राणी बाग प्रशासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. पेंग्विन नंतर अनेक प्राणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. राणी बागेत सिंह येणार अशी मोठी जाहिरात पालिकेने २०२३- २०२४ साली केली होती. मात्र, वर्ष उलटूनही राणी बागेत सिंहाचे आगमन झाले नाही. गुजरातेतील सक्करबाग प्राणीसंग्रहालय आणि केवडिया झू येथून सिंह आणण्याचे नियोजन पालिकेचे होते. त्यासाठी, खुद्द पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी प्रयत्न केले. मात्र, गुजरात प्रशासनाने प्राण्याच्या बदल्यात प्राणी देण्याची मागणी केली. पालिकेकडे गुजरात प्रशासनाला देण्याकरिता केवळ पेंग्विन हा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, गुजरात प्रशासनाकडे पेंग्विनसाठी लागणारे आवश्यक वातावरण नसल्याने प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या या प्रस्तावाला नकार दिला. तसेच, सिंहाच्या बदल्यात अन्य प्राण्याची सोय नसेल तर यावरील चर्चा थांबवण्याचा सल्ला गुजरातने मुंबई पालिका प्रशासनाला दिला असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

... तर राणी बागेत यावेसे वाटणार नाही

राणी बागेचे आकर्षण असलेल्या हत्तीच्या मृत्यूनंतर राणी बागेत नवीन प्राणी येणार असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप तरी नवीन प्राणी आलेले नाहीत. तेच तेच प्राणी पाहून लहान मुलेही कंटाळली आहेत. जर नवीन प्राणी पाहायला मिळणार नसतील तर राणी बागेत पुन्हा यावेसे वाटणार नाही, असे पर्यटक सुजित किल्लेकर म्हणाले.

सिंह पाहण्यासाठी उत्सुकता

गेल्या काही वर्षांपासून आम्ही मुलांना राणीच्या बागेत नियमित घेऊन येतो. मात्र आता बागेत हत्ती दिसत नाही. सिंह आणि लांडगा येणार अशी जाहिरात पाहायला मिळते. परंतु या प्राण्यांचे दर्शन काही होत नाही. जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे पर्यटक जीनत शेख सांगतात.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री