तेजस वाघमारे/मुंबई
मुंबईतील कापड गिरण्यांमधील गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत गिरणी कामगारांना घराचे वाटप करण्यात येत आहे. मात्र म्हाडाकडे सध्या गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी काढण्यासाठी गृहसाठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाच घरांसाठी तब्बल ९८ हजार ३४५ गिरणी कामगार पात्र झाले असून ते घराच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य सरकारने गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधून लॉटरीमार्फत कामगारांना घरे दिली आहेत. म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे मागवली आहेत. आतापर्यंत म्हाडाकडे १ लाख ११ हजार ८७४ कामगारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये ९८ हजार ३४५ कामगार आणि वारस घरासाठी पात्र ठरले आहेत. तर १० हजार १०९ कामगार आणि वारस अपात्र झाले आहेत. तर ३ हजार ४२० अर्ज प्रलंबित आहेत.
गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यात घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच म्हाडाने एमएमआरडीएकडून प्राप्त झालेल्या घरांची लॉटरी काढून त्याचे वाटप सुरू केले आहे. एमएमआरडीएकडून आणखी काही घरे मिळविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र गिरणी कामगारांची पात्रता झाल्याने गिरणी कामगार आणि वारस घराच्या प्रतिक्षेत आहेत. म्हाडाकडे गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी घरे उपलब्ध नसल्याने लॉटरी काढण्यात येत नसल्याचे म्हाडातील वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याप्रकरणी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
वारसांकडून मागवली कागदपत्रे
-यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून म्हाडाने कागदपत्रे मागितली आहेत.
-अद्यापही कामगारांकडून ऑनलाइन आणि ऑनलाइन अर्ज करण्यात येत आहे.
म्हाडाकडे प्राप्त झालेले अर्ज
-ऑफलाईन पद्धतीने १० हजार ३८३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ९ हजार १७५ पात्र झाले असून १ हजार २०७ अपात्र झाले आहेत. तर एक अर्ज प्रलंबित आहे.
-ऑनलाइन १ लाख १ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८९ हजार १७० अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ८ हजार ९०२ अपात्र झाले आहेत. तर ३ हजार ४१९ अर्ज प्रलंबित आहेत.