पूनम अपराज/मुंबई
मुंबई पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोलीस आयुक्तालयाच्या रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. गृह विभागाने १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबई पोलीस दलात दोन नवीन पोलीस झोन आणि चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुनर्रचनेमुळे मुंबईत आता दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे पाच प्रमुख प्रादेशिक विभाग असतील. झोपडपट्टी बहुल भाग आणि अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यांमधील अंतर लक्षात घेऊन नवीन पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याचा धाक आणखी वाढणार आहे.
दक्षिण विभागांतर्गत आता तीन झोन असतील. यामध्ये दक्षिण झोन-१ मध्ये कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, एमआरए मार्ग, डोंगरी आणि सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
दक्षिण झोन-२ मध्ये पायधुनी, एल. टी. मार्ग, व्ही. पी. रोड, डी. बी. मार्ग, गावदेवी, मलबार हिल आणि यलो गेट या पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन दक्षिण झोन-३ मध्ये मुंबई कोस्टल-१, मुंबई कोस्टल-२, वडाळा आणि शिवडी पोलीस ठाणी असतील.
मध्य विभागाचीही तीन झोनमध्ये विभागणी झाली असून यामध्ये ताडदेव, नागपाडा, भायखळा, वरळी, दादर, माहीम आणि धारावी यासारख्या प्रमुख पोलीस ठाण्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे.
काही महत्त्वाचे बदल
पूर्व विभागात महत्त्वाचे बदल करताना नवीन पूर्व झोन-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये नेहरुनगर, चुनाभट्टी, घाटकोपर, टिळकनगर आणि विक्रोळीसह महाराष्ट्रनगर पोलीस ठाण्याचा समावेश असेल.
पश्चिम विभागातील पश्चिम झोन-२ हा सर्वात मोठा झोन ठरला असून यात वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि दहिसर यांसारख्या १५ पोलीस ठाण्यांचा कार्यभार असेल.
उत्तर विभागात जुन्या झोन-११ आणि झोन-१२ चे नामकरण अनुक्रमे उत्तर झोन-२ आणि उत्तर झोन-३ असे करण्यात आले असून एक नवीन उत्तर झोन-१ तयार करण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होणार
मुंबई पोलीस दलातील या नवीन रचनेमुळे शहरात आता एकूण १५ झोन असतील आणि प्रत्येक झोनचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यरत राहतील. यापूर्वी बंदर विभागासह शहरात १३ झोन अस्तित्वात होते. या प्रशासकीय बदलांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणे अधिक सोपे होईल आणि सार्वजनिक सेवा वितरणाचा वेग वाढेल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नव्या रचनेनुसार पाचही प्रादेशिक विभागांत आता प्रत्येकी तीन झोन कार्यरत राहतील.