अनधिकृत ‘बाईक टॅक्सी ॲप्स’वर कारवाईचे आदेश; कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र (Photo-X/@PratapSarnaik)
मुंबई

अनधिकृत ‘बाईक टॅक्सी ॲप्स’वर कारवाईचे आदेश; कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत ‘बाईक टॅक्सी’ सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत ‘बाईक टॅक्सी’ सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत ‘बाईक टॅक्सी ॲप’ सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राइम विभागाला पत्राद्वारे केली आहे.

राज्यात विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासनमान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः ‘रॅपिडो’सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे परिवहन मंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

या अनधिकृत सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नसून चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अत्यंत अपुरी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुलुंड-गोरेगाव लिंक मार्गावर अनधिकृत बाईक टॅक्सीचा अपघात होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पत्रात नमूद केले असून, याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची नोंद होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परवानाधारक रिक्षा-टॅक्सीचालकांवर अन्याय

शासनाच्या परिवहन नियमांचे खुलेआम उल्लंघन करून या ॲप्समार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याने परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर अन्यायकारक परिणाम होत आहे. कायद्याला न जुमानता सुरू असलेली ही व्यवस्था राज्याच्या परिवहन व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान बनत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. सायबर क्राइम विभागाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अनधिकृत ‘बाईक टॅक्सी ॲप्स’चे ऑनलाइन संचालन तत्काळ बंद करणे, संबंधित ॲप कंपन्या, चालक आणि व्यवस्थापनाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करणे तसेच कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा समावेश आहे.

Mumbai : अखेर वसई-विरारचा मेट्रो मार्ग झाला मोकळा; MMRDA च्या आयुक्तांकडून प्रकल्प अहवाल सादर

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून खळबळ; प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना वगळले

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या स्वप्नाला बळ; राज्य सहकारी बँकेकडून १,७४८ कोटींचे अर्थसहाय्य

कल्याणमध्ये विनयभंगप्रकरणी भोंदूबाबा गजाआड

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ? साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास कार्यक्रमावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप