मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत चक्क चप्पलच्या टाचांमध्ये लपवून आणलेले सोने पकडले आहे. अदिस अबाबा (इथिओपिया) येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या चाड देशातील एका नागरिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३.८६ कोटी रुपये किमतीचे ४,०१५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशावर लक्ष ठेवले होते. तो मुंबईत उतरताच अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्या चप्पलांच्या टाचांमध्ये अत्यंत चलाखीने लपवलेले सोन्याचे बार आढळून आले.
चप्पलच्या तळव्याखाली सोन्याचे बार
प्रवाशाने सीमाशुल्क तपासणी आणि कायदेशीर ओळख टाळण्यासाठी ही पद्धत वापरली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. १९६२ च्या सीमाशुल्क कायद्यानुसार हे संपूर्ण सोने जप्त करण्यात आले असून प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटची शक्यता
या तस्करीमागे कोण आहे, हे सोने कोणासाठी आणले जात होते, आणि यामागे मोठे तस्करी नेटवर्क कार्यरत आहे का? याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित प्रवासी कोणाच्या सांगण्यावरून हे सोने घेऊन आला होता, याचा शोध घेतला जात आहे.
याआधी एप्रिल २०२५ मध्ये डीआरआयने अशीच कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ६.३० कोटी रुपयांचे परदेशी मूळचे सोने जप्त केले होते. ते सोने खास डिझाइन केलेल्या डब्यांमध्ये लपवलेले होते.