मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मध्ये गेले चार दिवसांपासून मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. सोमवारी दुपारी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काही आंदोलक रेल्वे रूळांवर उतरले तसेच काहींनी मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सीएसएमटी स्थानकात दुपारी १ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक-२ वर लोकल आली. यावेळी मराठा आंदोलक रेल्वे रूळावर उतरले. तर काही आंदोलक लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसले. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक झळकावले. तर काही आंदोलकांनी लोकलसमोर उभे राहून घोषणाबाजी केली. आंदोलकांनी रेल्वे रोखण्याचे प्रकार केला नाही.
दरम्यान, हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात मराठा आंदोलक रेल्वे रूळांवर उतरले होते. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. शेकडो मराठा आंदोलक रेल्वे रूळ ओलांडून, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जात होते. त्यामुळे लोकल मार्गस्थ होण्यास अडचणीचे ठरत होते.