मुंबई

मेहुल चोक्सीला हायकोर्टाचा झटका

फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी

मुंबई : कुख्यात हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चोक्सीच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या चोक्सीच्या चारही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावल्या. यामुळे केंद्रीय यंत्रणेला चोक्सीच्या मालमत्तांवर जप्ती आणता येणार असल्याने चोक्सीला मोठा झटका बसला आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी हा मुख्य आरोपी आहे. त्याने भाचा नीरव मोदीच्या साथीने हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवले आणि नंतर तपास यंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी परदेशात पळ काढला. ईडीने मालमत्तांवर जप्ती आणण्यासाठी त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. तथापि, हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे ही प्रक्रिया प्रलंबित होती. चोक्सीला २०१८ च्या कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला चोक्सीने अॅड. विजय अग्रवाल आणि अॅड. राहुल अग्रवाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या चार याचिकांवर ईडीतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर आणि अॅड. आयुष केडिया यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी गुरुवारी जाहीर केला. न्यायालयाने चोक्सीच्या चारही याचिका फेटाळल्याने मालमत्ता जप्तीचा मार्ग मोकळा होऊन ईडीसह गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा