मुंबई

हवामान विभाग होणार आणखी आधुनिक; कुलाबा हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांची माहिती

भारतापेक्षा परदेशातील हवामान विभागाकडे अद्ययावत यंत्रणा असल्याने पावसाचा अचूक अंदाज बांधला जातो, हा समज चुकीचा आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

भारतापेक्षा परदेशातील हवामान विभागाकडे अद्ययावत यंत्रणा असल्याने पावसाचा अचूक अंदाज बांधला जातो, हा समज चुकीचा आहे. विदेशात ज्या उपकरणाचा वापर होतो, त्याच उपकरणांचा वापर भारतातही होतो. भारत हा विषुववृत्ताच्या जवळचा देश आहे. भारतात हवामानाचे अनेक प्रकार दिसून येतात. परदेशात भारतासारखे वेगवेगळे हवामानाचे प्रकार नसतात. त्यामुळे भारतात हवामानाचा अंदाज वर्तवणे कठीण असते. संपूर्ण भारतात सद्यस्थितीत ४० डॉपलर वेदर रडार ॲॅक्टीव्ह असून आणखी ३० नवीन डॉपलर वेदर रडार ॲॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. सॅटेलाइट इमेज डॉपलर रडारमुळे दर १० मिनिटांनी हवामानाबाबत अपडेट मिळणार, असा विश्वास कुलाबा हवामान विभागाचे प्रमुख अधिकारी सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.

दैनिक 'नवशक्ति'च्या कार्यालयाला सुनील कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन शंकानिरसन केले. दरम्यान, चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात भारत नंबर वन आहे. त्याची प्रशंसा संपूर्ण जगात केली जाते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत २१ जूननंतर जोरदार पाऊस पडणार

दरवर्षी केरळमध्ये १ जूनपर्यंत पाऊस दाखल होतो आणि मुंबईत ११ जूनपर्यंत येतो. त्यानंतर तो राज्यात पसरतो. मात्र यंदा केरळात ३१ मे रोजी, तर मुंबईत ९ जून रोजी मुंबईत पाऊस सुरू झाला. आता पावसाला सुरुवात झाली, असे सर्वांना वाटले. मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याने पाठ फिरवली. परंतु पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून २१ जूननंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सक्रिय होईल. मुंबईत चार महिन्यांत जुलै महिन्यात ४० टक्के पाऊस बरसतो. यंदाही जून महिन्यात पावसाची दमदार इनिंग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पावसाचा अचूक अंदाज घेण्यासाठी डॉपलर वेदर रडार अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबईत दोन डॉपलर वेदर रडार असून महाराष्ट्रात ॲॅटोमॅटिक रेन फॉलिंग स्टेशन १५० आहेत, तर मुंबईत अॅटोमॅटिक रेन फॉल स्टेशन १५० आहेत. यामुळे दर १५ मिनिटांनी डेटा उपलब्ध होतो आणि १५ मिनिटांपूर्वी कुठल्या भागात किती पाऊस पडला हे स्पष्ट होते. डॉपलर वेदर रडार हा ५०० किमी परिसराचा डेटा दर १० मिनिटांनी उपलब्ध करून देतो. डॉपलरमुळे अचूक माहिती उपलब्ध होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यात सर्वसाधारणपणे ढग १५ ते १८ किमीवर असतात, तर त्यांचा परिघ २०० ते ३०० किमीपर्यंत असतो. हे ढग एकदम खाली आले आणि वाऱ्याचा वेग वाढला तर अतिवृष्टीचा धोका अधिक असतो, असेही ते म्हणाले.

अवकाळी पाऊस नव्हे, प्री मान्सून

जूनमध्ये पावसाला सुरुवात होते. त्याआधी पाऊस पडतो आणि पाऊस जातानाही बरसतो, त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो. पाऊस येण्याआधी व जाताना पडतो तो प्री मान्सून पाऊस असतो. ही प्रक्रिया आज-उद्याची नसून शंभर वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले.

मुंबई मान्सून लाइव्हवर पावसाची अपडेट

मुंबईत कुठल्या भागात किती पाऊस बरसला, १५ मिनिटांपूर्वी किती, अर्ध्या तासापूर्वी किती आणि मागील २४ तासांत किती पाऊस बरसला याची संपूर्ण अपडेट मुंबईकरांना मिळावी यासाठी ‘मुंबई मान्सून लाइव्ह’ वेबसाइट उपलब्ध केली आहे. या वेबसाइटवर कुठे व किती वाजता पाऊस पडेल याची माहिती अचूकपणे दिली असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी ‘मुंबई मान्सून लाइव्ह वेबसाइट’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

विमान वाहतूक क्षेत्राला आगाऊ सूचना

पावसाळ्यात विजेचा गडगडाट, ढगांच्या गर्दीमुळे विमान प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात विमानतळ व विमान कंपन्यांना हवामानाचा आगाऊ अंदाज दिला जातो.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी