मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मुंबईतील पहिल्या भुयारी ‘मेट्रो-३’ मार्गिकेचा आरे ते बीकेसी पहिला टप्पा गतवर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या मेट्रोचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा ‘२-अ’ टप्पा मार्च महिन्याच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
‘मेट्रो-३’ प्रकल्पाचे एकूण ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर स्टेशनशी संबंधित ९८.९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित आर्किटेक्चरल आणि सिस्टम इंस्टॉलेशन लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी ‘एमएमआरसी’कडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना आरे ते वरळीपर्यंत ‘मेट्रो-३’ने प्रवास करता येणार आहे.
हा टप्पा सुरू झाल्यास मुंबई लोकलवर पडणारा ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान, ‘एमएमआरसी’ने ‘बीकेसी-कुलाबा’ टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे.