भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकाराने खळबळ उडाली आहे. तब्बल ५ लाख १४ हजार ९५५ मतदारांच्या यादीतून २ लाख १३ हजार ४५ मतदारांच्या नोंदी कायमस्वरूपी वगळण्यात आल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मतदार याद्यांच्या एसआयआर पडताळणी प्रक्रियेतून ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्याचे सांगत सरनाईक यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तत्कालीन मतदार यादीत ५ लाख १४ हजार ९५५ मतदार नोंदवले गेले होते. त्यानंतर झालेल्या प्रशासकीय छाननी व प्रत्यक्ष पडताळणीत २ लाख १३ हजार ४५ नोंदी कायमस्वरूपी बाद करण्यात आल्या. याशिवाय ४७ हजार ९०१ मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित असून, त्यांची सुनावणी व खातरजमा केली जाणार आहे. तर ४८ हजार ३७९ मतदारांच्या नोंदींमध्ये तांत्रिक विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले.
२०१९ च्या यादीतही मोठी तफावत?
२०१९ च्या मतदार यादीतील भाग क्रमांक ४८७ संदर्भातही सरनाईक यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या माहितीनुसार, या भागातील ५ लाख ६७ हजार ९७२ मतदारांच्या नोंदींपैकी मोठ्या संख्येने मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित आहे. यामुळे त्या काळातील मतदार यादी तयार करताना नेमकी कोणती प्रक्रिया राबवण्यात आली, याची चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
महापालिका आयुक्तांवरही निशाणा
संपूर्ण प्रकरणात केवळ निवडणूक यंत्रणेलाच जबाबदार न धरता स्थानिक पक्षीय यंत्रणेच्या भूमिकेवरही सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदींमध्ये अनियमितता असेल, तर ती स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या लक्षात वेळेत यायला हवी होती, असे त्यांनी स्पष्ट केले. “महापालिका आयुक्तांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही चौकशीचा केवळ दिखावा करण्यात आला. कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,” असा आरोप सरनाईक यांनी केला.