मुंबई

मीरा-भाईंदरमध्ये महिला महापौर विराजमान होणार; भाजपकडून 'या' नावांची जोरदार चर्चा

महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अनेक नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.

Krantee V. Kale

भाईंदर : मीरा-भाईंदर मनपाच्या महापौरपदासाठी महिला खुला प्रवर्ग आरक्षित झाल्याने भाजपची महिला महापौर विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शहराचा पुढील महापौर कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अनेक नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये नगरसेविका अनिता पाटील, शानु गोहिल, वर्षा भानुशाली, वंदना पाटील, नीला सोंस, स्नेहा पांडे, दीप्ती भट, नयना म्हात्रे, सुनीता जैन, सुरेखा सोनार, वंदना भावसार आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका म्हणून अनिता पाटील, वंदना पाटील, शानु गोहिल आणि नयना म्हात्रे यांची नावे पुढे येत आहेत. अनिता पाटील या सलग पाच वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून त्यांचा अनुभव लक्षवेधी मानला जात आहे. तसेच आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावजय डिंपल मेहता यांचे नावही महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यापूर्वी डिंपल मेहता, ज्योत्स्ना हसनाळे आणि निर्मला सावळे यांनी महापौरपद भूषवले आहे. मात्र यंदा खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने इतर नगरसेविकांनाही महापौर होण्याची संधी उपलब्ध झाली असून त्यांची स्वप्ने बहरली आहेत.

आमदार नरेंद्र मेहता यांचा निर्णय अंतिम

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. एकूण ९५ जागांपैकी भाजपकडे ७८, काँग्रेसकडे १३, शिवसेना (शिंदे गट) कडे ३, तर १ अपक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे महापौरपदाबाबत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा निर्णय अंतिम मानला जात आहे. दरम्यान, मागील वेळेस नगरसेविका नीला सोंस यांना महापौर करण्यावरून आमदार नरेंद्र मेहता यांच्यात पक्षांतर्गत वाद झाल्याची चर्चा होती. मात्र यंदाही नीला सोंस या पुन्हा एकदा महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे अनुभवी नगरसेविकांचे पारडे जड मानले जात असले, तरी नवख्या महिला नगरसेविकेलाही महापौरपदाची लॉटरी लागू शकते, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय