मुंबई

Mumbai : 'एमएमआर'मधील पहिला डबल-डेकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडीतून प्रवाशांची होणार सुटका

मुंबई महानगर प्रदेशातील हा पहिलाच डबलडेकर उड्डाणपूल आहे. हा पूल आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केला असून, त्यात मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी स्वतंत्र स्तर आहेत.

Swapnil S

भाईंदर/मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) पहिल्या डबल-डेकर उड्डाणपुलाचे उद्घाटन बुधवारी मीरा-भाईंदर येथे करण्यात आले. या अत्याधुनिक पायाभूत सुविधेत मेट्रो लाईन-९ साठी डबल-डेकर मेट्रो व्हायाडक्ट आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. हा उड्डाणपूल सुमारे १ किमी लांबीचा असून सध्याच्या रस्त्यापासून ५.५ मीटर उंचीवर असलेल्या या पुलामुळे मीरा रोड येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील हा पहिलाच डबलडेकर उड्डाणपूल आहे. आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन आणि एमएमआरडीएचे संयुक्त महानगर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले.

डबलडेकर उड्डाणपूल आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केला असून, त्यात मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी स्वतंत्र स्तर आहेत. यामुळे प्रवासाच्या वेळेची ८ ते १० मिनिटांची बचत होईल. यामुळे तीन जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहने एकाच ठिकाणी थांबलेल्या अवस्थेत असण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी, हरितगृह वायू (जीएचजी) तसेच इतर प्रदूषकांच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल. तसेच रस्त्याच्या पातळीवरील आवाज कमी होण्यासही मदत होईल आणि हिरवळीच्या जागांचे संरक्षण होईल.

या उड्डाणपुलाबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशातील पहिल्या डबलडेकर उड्डाणपुलाचे उद्घाटन करणे हा फक्त मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीची समस्या सोडवली जाईल, तसेच प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम नियोजनाच्या आधारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील विकासाला गती मिळेल. यासोबतच, या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक सुसूत्रता सुधारेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी होईल.

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, "डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्प हा एमएमआरडीएच्या नव्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे. मुंबई आणि उपनगरातील जागेची कमतरता पाहता मेट्रोच्या खांबांवर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील शहरी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

२ वर्षांत प्रकल्प पूर्ण

या पुलाच्या बांधकामात आय-गर्डर प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची बचत झाली आणि उच्च दर्जा राखता आला. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘टायर स्ट्रॅडल कॅरियर’ तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा यू-गर्डर्स उभारण्यात आले. हे तंत्रज्ञान वापरल्याने वाहतूक थांबवावी लागत नाही. हे तंत्रज्ञान महत्त्वाचे होते. कारण या मार्गावर दर तासाला सुमारे ८०० वाहने प्रवास करतात. यामुळे हा प्रकल्प २ वर्षांत पूर्ण करण्यात आला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी