भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर सध्या राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका तर केलीच शिवाय, शिंदे गटानेदेखील त्यांचे कान टोचले आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, "चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानासाठी भाजपचा काहीही संबंध नाही," असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील राज ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडियो ट्विट केला आहे. "अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा," असे कॅप्शन देत त्यांचा व्हिडियो ट्विट केला आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, "बाबरी मशीद पाडली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला होता. यावेळी ते म्हणाले होते की, जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला अभिमान आहे. असे ते बोलले असल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे."