मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शक तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्वतोपरी व व्यापक तयारी केली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही मूल्यांचे संवर्धन व्हावे तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी गगराणी यांनी निवडणुकीच्या विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती दिली. बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, जोडपत्र १ आणि जोडपत्र २, निवडणूक उमेदवार प्रतिनिधी नियुक्ती यासह विविध मुद्यांवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार, सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
सविस्तर मार्गदर्शन
निवडणुकीच्या सुलभ संचलनासाठी प्रशासकीय विभाग कार्यालयनिहाय कार्यान्वित करण्यात आलेल्या एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत सविस्तर माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. यासोबतच नामनिर्देशन प्रक्रिया, अर्जांची छाननी, हरकती नोंदवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील दैनंदिन कामकाजासाठी या कार्यालयांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
...तर उमेदवारी अर्ज बाद होणार
निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) विहित नमुन्यातच सर्व माहिती सादर करावी. उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रामध्ये सर्व माहिती अचूक आणि स्पष्टपणे भरणे बंधनकारक आहे. शपथपत्रातील कोणताही रकाना कोरा ठेवल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराचे नामनिर्देशन रद्द होऊ शकते, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
खर्चाची नोंद ठेवून तो सादर करा
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी. पालिकेच्या वतीने ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. उमेदवारांनी प्रचारादरम्यान होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आणि विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे, असे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.