मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नाही; मुंबई पोलिसांचा खुलासा  
मुंबई

मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नाही; मुंबई पोलिसांचा खुलासा

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या मानसिक आरोग्यासह त्याच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीचाही सखोल तपास केला जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई :  मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फय्याज प्रेमजीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी मंगळवारी (दि. ३०) स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या मानसिक आरोग्यासह त्याच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीचाही सखोल तपास केला जात आहे.

३० हजार विषारी कॅप्सूल वाटल्याचा आरोप

३९ वर्षीय बीबीए पदवीधर फय्याज प्रेमजी याने मोहरम मिरवणुकीदरम्यान भायखळ्यातील रे रोड आणि भायखळा पूर्व कब्रस्तान परिसरात झिंक फॉस्फाइडयुक्त सुमारे ३० हजार कॅप्सूल वाटल्याचा आरोप आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

संपूर्ण जग शत्रू असल्याची भावना

पोलीस चौकशीत फय्याज प्रेमजीने कथितपणे संपूर्ण जग आपला शत्रू असल्याची भावना व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांच्या मदतीने रसायनांबाबत माहिती मिळवून या कॅप्सूल तयार केल्याचे, तसेच त्यांच्या घातक परिणामांची कल्पना असल्याचेही त्याने चौकशीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासानुसार, आरोपीच्या मनात वैयक्तिक पातळीवर तीव्र नाराजी होती आणि त्यातून समाजाविरोधात सूड उगवण्याची त्याची मानसिकता तयार झाली होती.

वेदनाशामक गोळ्या असल्याचे सांगून वाटप

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने डोंगरीपासून रे रोडवरील रहमताबाद कब्रस्तानापर्यंतच्या मोहरम मिरवणुकीच्या मार्गावर या कॅप्सूलचे वाटप केले. 'कामा' हा काही शोककर्त्यांकडून पाळला जाणारा विधी पूर्ण झाल्यानंतर वेदनाशामक गोळ्या असल्याचे सांगून त्याने या कॅप्सूल लोकांना दिल्या.

कुटुंबीयांची चौकशी, मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी फय्याज प्रेमजीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच त्याचा मोबाईल फोन जप्त करून न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

कॅप्सूल घेतली अन् प्रकृती बिघडली

या प्रकरणाचा उलगडा एका पीडिताची प्रकृती बिघडल्यानंतर झाला. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील २६ वर्षीय सलमान मोहम्मद इस्लाम सय्यद याने कॅप्सूल घेतल्यानंतर त्याला तीव्र पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला डोंगरी येथील हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मानसिक आरोग्य आणि ऑनलाइन हालचालींचा तपास

आरोपीला अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या मानसिक आरोग्याची, इंटरनेटवरील हालचालींची आणि डिजिटल पुराव्यांची पोलिसांकडून सखोल तपासणी केली जात आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश