मुंबई : मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आरखडा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्यावतीने मांडण्यात आलेल्या नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील पावसाळी परिस्थितीवर चर्चा झाली होती. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी मुंबईतील पूरपरिस्थितीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रस्तावित आराखड्यातील अनेक गोष्टी पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्यात येतील. या आराखड्याच्या अंतर्गत शहरातील ३७० हॉटस्पॉट्सवर विशेष कामे करण्यात येणार असून या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याचे उद्दीष्ट आहे, असे फडणवीस म्हणाले.
अर्ध्या तासात पाण्याचा निचरा
मुंबईत मुसळधार पावसाबरोबरच भरतीची वेळ आल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या आराखड्यात अशा प्रत्येक पूरग्रस्त ठिकाणी अवघ्या ३० मिनिटांत साचलेले पाणी बाहेर काढण्याची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकराची पावसाच्या पुरातून सुटका होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सभागृहातील चर्चेप्रमाणे यंदाचा पावसाळाही तुफानी ठरला, असे सांगतानाच फडणवीस यांनी मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातील ४ दिवसात पूर्ण महिन्याभरातील ९० टक्के पाऊस पडल्याची माहिती दिली. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे ५० ते ७५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी ५ मृत्यू झाडे पडून, दरड कोसळून ३, इमारती कोसळून १३ मृत्यू होतात. मॅनहोलसमध्ये पडून आतापर्यंत ७ मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मूळांची क्षमता मोजून, मुळे अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेल्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल, ती विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत, अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वसई-विरारची परिस्थिती गंभीर आहे. तिथे १ जुलैपासून दररोज जवळपास १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तिथे तैनात आहेत. मोबाईल आणि वीज जोडणी पूर्ववत करण्याचे काम चालू आहे. कोकणातील अशा काही जिल्ह्यांना आपण जादा निधीही दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
धारावीत दीड वर्षात १० हजार घरे
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तिथे तयार करणार आहोत. २०११ पूर्वीच्या लोकांना धारावीतच ३५० चौ. फूट घर देणार आहोत. या प्रकल्पातील अपात्र लोकांनाही आम्ही घर देणार असून यातील काही लोकांना धारावीत तर इतरांना जवळपास घर दिले जाईल. पुढील दीड वर्षात पुनर्वसनाची १० हजार घरे पूर्ण करायची आणि घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते करायचा, असा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
२०३० पर्यंत मुंबईला मुबलक पाणी
मुंबईची दिवसाची पाण्याची गरज ४ हजार ५६५ दशलक्ष लिटर असून सध्या ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. दरदिवशी ५०० दशलक्ष लिटरची टंचाई आहे. गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. यातून ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिनी पाणी मिळणार आहे. मे २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मनोरी आणि वर्सोवा येथे नि:क्षारीकरण प्रकल्पाचे काम सुरू असून २०३० पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईला पाणी मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.