मुंबई : मुंबईतील गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीएसएमटी स्थानकावरील नीलम फूड कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या ३० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीने रेल्वे कर्मचारी असल्याचा बनाव करत झारखंडला जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मुरलीलाल गुप्ता (३० वय) याला अटक केली आहे.
ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला पतीसोबत झारखंडला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी सोमवारी रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली होती. त्यावेळी आरोपी गुप्ताची नजर या दांम्पत्यावर पडली. त्यांच्या जवळ जात त्याने गळ्यातील ओळखपत्र दाखवत रेल्वेचा कर्मचारी असल्याची बतावणी केली आणि नियमित तपासणी सुरू असल्याचे सांगितले. प्रथम त्याने महिलेच्या पतीला तपासणीसाठी वेटिंग रुममध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर महिलेला आपल्यासोबत फलाट क्रमांक ११ वर घेऊन गेला.
त्याने महिलेच्या सामानाची झडती घेण्यास सुरूवात केली आणि नंतर तपासणीच्या बहाण्याने पीडितेला अयोग्यरित्या स्पर्श केला. मात्र, महिलेने विचारणा करताच आरोपीने तेथून पळ काढला. या घटनेमुळे महिला स्तब्ध झाली होती. त्यावेळी काही पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांची नजर पीडितेवर पडली. तिने त्यांना झालेली घटना सांगितली आणि गंभीर दखल घेत महिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि त्याला बेड्या घातल्या.