मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी सुरू आहे. अनेक वाहनं तासन्‌तास रांगेत उभी राहत असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सलग चौथ्या दिवशी ही कोंडी कायम आहे.

नेहा जाधव - तांबे

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी सुरू आहे. अनेक वाहनं तासन्‌तास रांगेत उभी राहत असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी संध्याकाळी (दि. १४) शालेय सहलीहून परतणाऱ्या बस तब्बल १२ तास वाहतूक कोंडीत अडकल्या. या भीषण परिस्थितीमुळे आता मुंबईतील २० ते २२ शाळांनी पिकनिक पुढे ढकलल्या आहेत. आज सलग चौथ्या दिवशी ही कोंडी कायम आहे.

थेट दिवाळीनंतर पिकनिक?

मंगळवारी (दि. १४) रात्री पिकनिकहून परतणाऱ्या शाळा आणि कॉलेजच्या बस तब्बल १२ तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. संध्याकाळी सुरू झालेली ही कोंडी बुधवारी (दि. १५) पहाटेच सुटली. या दरम्यान सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी महामार्गावर अडकले होते. वसई परिसरात ही कोंडी तब्बल ७० किलोमीटरपर्यंत पसरली होती. यामुळे मुंबईतील २० हून अधिक शाळांनी वसई येथे आयोजित केलेल्या पिकनिक पुढे ढकलल्याचा निर्णय घेतला. काही शाळांनी तर थेट दिवाळीनंतर पिकनिक आयोजित करण्याचे ठरवले.

१२ तास अडकले विद्यार्थी

दादर येथील एका शाळेचे विद्यार्थी वज्रेश्वरीतील ग्रेट एस्केप वॉटर पार्क येथून परत येत असताना मंगळवारी संध्याकाळी प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकले. साधारण दोन-तीन तासांत घरी पोहोचायचं असताना, विद्यार्थ्यांना तब्बल १२ तास रस्त्यातच थांबावं लागलं. काही जण पहाटे ६ वाजताच घरी पोहोचले. मुंबई आणि ठाण्यातील विविध शाळांच्या १२ बसेस तसेच काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. दादर आणि मालवणी येथील शाळांच्या सहा-सहा बसेस संपूर्ण रात्र महामार्गावरच उभ्या राहिल्या.

अन्न-पाण्याविना अडकली मुले

कोंडीमुळे विद्यार्थ्यांना ना अन्न मिळाले ना पाणी. काहीजण भुकेने आणि थकव्याने त्रस्त झाले. वाहनांची हालचाल जवळजवळ थांबली होती. पालक मात्र मुलांशी संपर्क होत नसल्याने रात्रभर काळजीत होते. अनेकांनी या परिस्थितीबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

मदर टेरेसा ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सुरेश सुधापेली यांनी ‘मिड डे’शी बोलताना सांगितले,
"जो दिवस मजेशीर असायला हवा होता तो झोपेचा आणि चिंताग्रस्त परीक्षेत बदलला. मंगळवारी संध्याकाळी आमचे ३०० हून अधिक विद्यार्थी १० तास कोंडीत अडकले होते. या दरम्यान डिहायड्रेशन आणि थकव्यामुळे अनेक विद्यार्थी जवळजवळ बेशुद्ध पडले. काहींना अस्वस्थही वाटू लागले. पाणी आणि अन्नाची सोय करण्यासाठी शिक्षकांना लांब अंतर चालत जावं लागलं."

एनएच-४८ हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मात्र, रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी खड्डे आणि अरुंद भाग निर्माण झाले आहेत. त्यामुळे गाड्या वारंवार अडकतात आणि प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरतो. हा रस्ता नेहमीच समस्येत असल्याचं स्थानिकांचे म्हणणं आहे.

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Bihar Assembly Elections 2025 : प्रशांत किशोर यांची माघार

ठाण्यात महायुतीला सुरुंग? भाजप-शिंदे सेनेचा ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा