मुंबईहून लंडनच्या हीथ्रोसाठी जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-१२९ या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे मोठा विलंब झाला आहे. नियोजित वेळेनुसार शनिवारी (दि. ८) सकाळी ६.३० वाजता हे विमान उड्डाण घेणे अपेक्षित होते, मात्र उड्डाणाच्या काही मिनिटे आधी विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्याने प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच थांबवण्यात आलं. प्रवासी अनेक तासांपासून विमानतळावरच अडकल्यामुळे चांगलेच वैतागले आहेत.
नेमकं काय घडलं?
सुरुवातीला फक्त ३० मिनिटांचा विलंब असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात बोर्डिंगला सकाळी ६ वाजेनंतरच सुरूवात झाली. त्यानंतर प्रवासी विमानात बसल्यानंतरही विमान तब्बल एक तास जागेवरच उभे होते. अखेर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे सुरक्षिततेसाठी विमानातून उतरावं लागेल, अशी माहिती दिली आणि सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. प्रवाशांच्या हॅंड बॅगेजची देखील पुन्हा तपासणी करण्यात आली. सकाळच्या वेळेचं उड्डाण असल्याने झोप न झालेल्या प्रवाशांनी या दीर्घ प्रतीक्षेमुळे नाराजी व्यक्त केली.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की हा बिघाड विमानाशी संबंधित तांत्रिक कारणामुळे झाला असून, तो एअरलाइनच्या ‘मेंटेनन्स अँड सेफ्टी सिस्टीम’ (AMSS) शी संबंधित नाही. नंतर एअर इंडियाने सुधारित वेळ जाहीर करत उड्डाण आता दुपारी १ वाजता होईल, असे जाहीर केले आहे. प्रवाशांना आराम मिळावा यासाठी लाउंजमध्ये अल्पोपहार आणि जेवणाची सोय करण्यात आली. विमानतळावर तात्पुरती मदत पुरवली जात असून, उड्डाण परवानगी मिळताच प्रवास सुरू होईल, असं आश्वासन दिलं.
एअर इंडियाची दिलगिरी
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी विमानाला विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून पायलट आणि कर्मचाऱ्यांवर ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) लागू झाल्याने ते तत्काळ उड्डाण करू शकत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. तसेच, प्रवाशांना शक्य तितक्या लवकर गंतव्यस्थळी पोहोचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियासाठी प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही सांगितले.