कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, विमान प्रवाशांचे हाल; मुंबई विमानतळावर ३ तास काम ठप्प एक्स
मुंबई

Mumbai : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, विमान प्रवाशांचे हाल; मुंबई विमानतळावर ३ तास काम ठप्प

भारतीय जनता पक्ष समर्थित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी सोमवारी अचानक संप पुकारल्याने विमान सेवा पूर्णपणे कोलमडली. भारतीय जनता पक्ष समर्थित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले. सामानाची ने-आण आणि कन्व्हेयर बेल्ट सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना विलंब झाला, तर काही विमाने रद्द करावी लागली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांची मोठी तारांबळ उडाली.

मुंबई विमानतळावर ही कंपनी सुमारे ८० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना सेवा पुरवते. संपामुळे विमानांमधून सामानाची चढ-उतार करणे कठीण झाल्याने धावपट्टीजवळ आणि टर्मिनसच्या आगमन कक्षात सामानाचे ढीग साचले होते. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, फ्लायदुबई, ओमान एअर यांसह अनेक कंपन्यांच्या विमान सेवांवर याचा साखळी परिणाम झाला. प्रवासी विमानांमध्ये बसून राहिल्यानंतरही तासभर विमानांचे उड्डाण होऊ शकले नाही. कामगारांनी २०१७ पासून प्रलंबित असलेली वेतन सुधारणा लागू करावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, कोरोना काळातील वेतन कपात परत करावी आणि आरोग्य विमा लागू करावा, अशा मागण्या केल्या आहेत.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्यवस्थापनाने मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २ वाजता हा संप मागे घेण्यात आला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विमानतळावरील परिस्थिती बऱ्याच अंशी सामान्य झाली असली, तरी एअर इंडियाच्या सेवांवर रात्री उशिरापर्यंत याचा परिणाम जाणवत होता. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्रयस्थ संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आमच्या आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या सेवांवर परिणाम झाला असून, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आमचे पथक प्रयत्नशील आहे.

नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच वऱ्हाडावर मृत्यूचा घाला! पालघरमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीही चिरडली; १३ ठार, अनेक जखमी

NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

आजचे राशिभविष्य, १९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गाजर-कोथिंबीर ज्यूसने वाढेल इम्युनिटी; जाणून घ्या सोपी रेसिपी

स्वयंनियमनाचे आवाहन आणि पोटशूळ