मुंबई : विमानतळांवर वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअरसारख्या सुविधांची वानवा असेल तर ती गंभीर बाब आहे, असे मत व्यक्त करत या वस्तुस्थितीवर उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची गैरसोय गांभीर्याने विचारात घेऊन तातडीने उपाययोजना करा, विमानतळावर कुणाचेही हाल होता कामा नये यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने दिले.
सप्टेंबर २०२३ मध्ये कोलंबोहून आलेल्या ८१ वर्षीय महिलेला मुंबईत उतरल्यानंतर गैरसोयीचा सामना करावा लागला. विमानतळावर व्हीलचेअर नसल्याने महिलेला केबिन क्रूने उंच रॅम्पवरून चालण्यास भाग पाडले, या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.
वृद्ध प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आहेत, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र खंडपीठाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे मागवले होते. त्यानुसार डीजीसीएने प्रतिज्ञापत्र दाखल केले. व्हीलचेअर्ससाठी अधिक मागणी होत असल्याने विमानतळावर व्हीलचेअर्सची कमतरता भासत असल्याचे महासंचालनालयाने मान्य केले. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
एखादी व्यक्ती विमानतळावर जाईपर्यंत ठणठणीत असू शकते. मात्र तिथे पोहोचल्यानंतर ती आजारी पडू शकते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला गरज भासणाऱ्या वैद्यकीय मदतीची तसेच आवश्यक साधनांची उपाययोजना करावीच लागेल, असे या सुनावणीवेळी खंडपीठाने डीजीसीएला सुनावले.