मुंबई

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

मुंबईतील पवई येथे बेस्ट बसने दुभाजकाला धडक दिल्याने सात प्रवासी जखमी झाले. कारकडे लक्ष गेल्यामुळे अपघात झाल्याचा चालकाचा दावा असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Mayuri Gawade

मुंबईत बेस्टच्या अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी (दि. २३) आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. पवई येथे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिल्याने सात प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्राथमिक चौकशीत चालकाने एका कारकडे लक्ष गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले आहे.

पवईत सकाळी अपघात

बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी ११.०५ वाजण्याच्या सुमारास पवई विहार संकुलाजवळ घडला. विक्रोळी डेपोतून वांद्रे (पश्चिम) बस स्थानकाकडे जाणारी ए-४२२/३६ मार्गावरील इलेक्ट्रिक बस (क्रमांक ८६८८) नियमित फेरीवर असताना अचानक दुभाजकावर जाऊन आदळली.

चालकाने काय सांगितले?

प्राथमिक चौकशीत चालकाने सांगितले की, बस चालवत असताना डाव्या बाजूने एक कार येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या कारकडे लक्ष गेल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उजव्या बाजूला वळत थेट रस्त्यावरील दुभाजकावर आदळली.

सात प्रवासी जखमी

या अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर वाहकाच्या मदतीने सर्व जखमींना साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकशी सुरू

अपघाताची माहिती मिळताच बेस्टचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा जबाब, रस्त्यावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, अपघातामुळे काही काळ पवई परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण