मुंबई

Mumbai : बेस्टची सीएनजी बस आगीत खाक; वाहक जखमी

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील सीएनजी बसला कांजूरमार्ग येथे इंजिनमध्ये बिघाड होऊन आग लागल्याने ती जळून खाक झाली.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील सीएनजी बसला सोमवारी कांजूरमार्ग येथे इंजिनमध्ये बिघाड होऊन आग लागल्याने ती जळून खाक झाली. या दुर्घटनेत बसवाहकाच्या हाताला भाजल्याने तो जखमी झाला, तर चालक बचावला आहे. या बसमध्ये त्यावेळी प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी हानी टळली.

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, धारावी आगाराची ही बस कंत्राटदार मातेश्वरी कंपनीची आहे. ती बसमार्ग क्रमांक ३०३ वर वांद्रे स्टेशन (प.) ते मुलुंड स्टेशनदरम्यान धावत होती. ही बसगाडी सोमवारी दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास लघुफेरी पूर्ण करून वळण घेऊन वांद्रे येथे जात असताना कांजूरमार्ग, गांधी नगर येथे बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला. इंजिनला आग लागल्याचे लक्षात येताच बसचालक संजय भगवान सूर्यवंशी (५४) यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. हळूहळू आग भडकत गेली. तोपर्यंत बसचालक व वाहक हे बसमधून बाहेर आले होते. मात्र या घटनेत वाहक अजित सराटे यांच्या उजव्या हाताला भाजल्याने जखम झाली. ही बस संपूर्णपणे खाक झाली. तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे