मुंबई : सोसायट्या, गाळेधारकांनी शहरातील पदपथांवरील अनधिकृतपणे उभारलेले उतरंडीचे मार्ग (रॅम्प), अतिक्रमणे, व्यावसायिक बांधकामे स्वखर्चाने महिनाभरात हटवावीत, अन्यथा मुंबई महापालिका स्वत: कारवाई करील आणि कारवाईच्या खर्चाची वसुली संबंधितांकडून करील, असा कडक इशारा मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.
पालिकेच्या सर्वच वॉर्डमध्ये जागोजागी फुटपाथवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे मुंबईकरांना चालणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना फुटपाथवरून मोकळेपणाने आणि सुरक्षितपणे चालता यावे यासाठी पालिकेने ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियान हाती घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील विले पार्ले परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव रेल्वे स्थानक मार्ग, शेठ श्री देवराजजी गुंदेचा चौक, गोरेगाव स्टेशनजवळील टोमॅटो गल्ली, दूध सागर मार्ग आदी परिसराची आज प्रत्यक्ष पाहणी केली. पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालता यावे, यासाठी फुटपाथ उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
भिडे यांनी गुरुवारी ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत पश्चिम उपनगरातील विविध फुटपाथची प्रत्यक्ष पाहणी करून हे निर्देश दिले. यावेळी सहआयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते.
व्यवसायिकांना पर्यायी जागा!
मुंबईत पदपथांवर जागोजागी असलेल्या स्टॉलचाही मुंबईकरांना चालताना त्रास होत आहे. त्यामुळे हे स्टॉल हटवण्याची कार्यवाही करावी आणि स्टॉलधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिले. गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बंडू गोरे मार्गावरील पदपथांवरील व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.
बंडू गोरे मार्गाने घेतला मोकळा श्वास!
गोरेगाव येथील बंडू गोरे मार्गाची लांबी ३५० मीटर असून रुंदी १३.४० मीटर आहे. या मार्गाचा दररोज सुमारे ७० हजार रेल्वे प्रवासी वापर करतात. पहिल्या टप्प्यात गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील ४३ व्यावसायिक बांधकामे हटविण्यात आली असून, रस्ताचे रुंदीकरण करण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात स्वामी विवेकानंद मार्ग आणि बंडू गोरे मार्गाच्या जंक्शनवर आवश्यक वळणाची रचना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी सुमारे ११ बांधकामे प्रभावित होत असून, ती यावर्षीअखेरपर्यंत हटविण्याचे प्रस्तावित आहे. या कामांचाही आयुक्त भिडे यांनी आढावा घेतला.
...म्हणूनच घेतला निर्णय
‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागांसह संपूर्ण मुंबईतच पदपथांवर गृहनिर्माण संस्था किंवा गाळेधारकांकडून त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी रॅम्प तयार केले आहे. अनेक ठिकाणी गाळेधारक, भाजीविक्रेते, फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे वाढीव बांधकाम किंवा दुकाने वाढवणे, माल फुटपाथवर लावणे, जाळ्या लावून जागा बंदिस्त करण्याचे प्रकार केले आहेत. अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातही घडत आहेत. वाहतुकीवरही याचा परिणाम होतो.
असे आहे अभियान
‘के पश्चिम’ विभागात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० कि.मी. लांबीचे पदपथ अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
तसेच के पश्चिम विभागातील एकूण ३५५ मार्गांपैकी २७ मार्ग हाती घेण्यात आले आहेत. या २७ मार्गांवरील ३७.७ किलोमीटर अंतराइतके पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत.