प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

धनशक्तीविरोधात जप्तीचे अस्त्र; तपास व अंमलबजावणी यंत्रणांना BMC आयुक्तांचे आदेश, सोने-चांदी खरेदीच्या व्यवहारांवर नजर 

कुठेही पैशांची देवाणघेवाण, मद्य आदी प्रलोभने तसेच सोने-चांदीची खरेदी, हवाला आदी संशयास्पद प्रकरणे लक्षात येताच थेट जप्तीची कारवाई करावी,

Swapnil S

मुंबई : विधानसभेची निवडणूक मुक्त वातावरणात आणि कोणत्याही गैरप्रकारांविना व्हावी यासाठी कुठेही पैशांची देवाणघेवाण, मद्य आदी प्रलोभने तसेच सोने-चांदीची खरेदी, हवाला आदी संशयास्पद प्रकरणे लक्षात येताच थेट जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई महानगरातील कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित विविध तपास व अंमलबजावणी यंत्रणांची महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी (२२ ऑक्टोबर)  बैठक पार पडली. यावेळी गगराणी यांनी हे निर्देश दिले. 

बैठकीच्या सुरुवातीला सर्व यंत्रणांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले नियोजन तसेच सुरू असलेल्या कार्यवाहींचा  गगराणी यांनी आढावा घेतला. सर्व यंत्रणांना ते म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये आलेल्या काही अनुभवांच्या आधारे, केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोग मुंबईतील निवडणुकीशी संबंधित बारीकसारीक बाबींवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे, मुंबईत कार्यरत असलेल्या प्रत्येक यंत्रणांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांचा आपापसांमध्ये योग्य समन्वय असावा, यासाठी प्रत्येक यंत्रणेने समन्वयक अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करावी.

तपासणी नाक्यांवर संयुक्त पथके

गगराणी यांनी निर्देश दिले की, संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथकांची निर्मिती करून त्यांची मुंबईतील तपासणी नाक्यांवर म्हणजेच ‘चेक पोस्ट’वर नियुक्ती करावी. समन्वयक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील माहितीची नियमितपणे देवाणघेवाण करावी, जेणेकरुन समन्वयाने कारवाई करता येईल. मुंबईच्या सीमेवर, बंदरांवर, समुद्रकिनाऱ्यांवर, विमानतळ तसेच वाहतुकीच्या अन्य संसाधनाद्वारे केल्या जाणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून संशयास्पद प्रकरणांमध्ये तत्काळ कारवाई करावी. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांबाबत दक्ष राहावे तसेच त्याठिकाणी काही गैरव्यवहार आढळून आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

संवेदनशील मतदारसंघांवर नजर 

आर्थिक खर्चाच्या बाबतीत काही मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहेत. त्याठिकाणी निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होणार नाही तसेच अशा संवेदनशील मतदारसंघांमध्ये होणारी पैशांची देवाणघेवाण, व्यवहार किंवा अन्य कोणत्याही संशयास्पद वित्तीय बाबींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे