मुंबई : आपल्या प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी ६० लाखांचा निधी अपुरा पडतो. त्यामुळे ६० लाखांऐवजी सर्वपक्षीय नगरसेवकांना १ कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरसेविका अश्विनी मते यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंगळवारी सभागृहात मंजुरी मिळाली आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर ठरावाची प्रत आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार असून नगरसेवकांना आता आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.
प्रभागातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहे, उद्यानांचे सुशोभीकरण तसेच अन्य तातडीची नागरी कामे करण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीचा वापर केला जातो. मात्र, वाढती महागाई, बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ आणि मजुरीच्या खर्चातही झालेली वाढ यामुळे सध्याचा ६० लाख रुपयांचा निधी अपुरा पडतो. त्यामुळे एक कोटींचा निधी करण्यात यावा, अशी ठरावाची सूचना नगरसेविका अश्विनी मते यांनी सभागृहात मांडली होती.
निधी वाढीच्या मागणीला ठाकरे सेना, काँग्रेसचेही समर्थन
तथापि, नगरसेविका मते यांच्या सूचनेला ठाकरे सेना व काँग्रेसनेही समर्थन दिले आहे. मंगळवारी सभागृहात मते यांची ठरावाची सूचना मंजूर झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांना आता १ कोटींचा निधी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, सभागृहाच्या मंजुरीनंतर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यावर आयुक्त अभिप्राय देतील. आयुक्त अश्विनी भिडे यांना अभिप्राय देणे शक्य न झाल्यास राज्य सरकारच्या ‘युडी’ विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१२ वर्षांनी होईल वाढ
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ४५ लाख रुपये शौचालयांच्या कामासाठी, तर १५ लाख रुपये विकासकामांसाठी दिले जातात. १२ वर्षांपूर्वी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता मात्र प्रत्येक गोष्टीच्या खर्चात वाढ झाली असून प्रभागातील विकासकामांसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना एक कोटीचा निधी उपलब्ध होईल. आयुक्तांचा अभिप्राय सकारात्मक आला, तर तब्बल १२ वर्षांनंतर नगरसेवक निधीत ४० लाखांनी वाढ होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.