मुंबई : मुंबईला हरित आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या उद्देशाने जलवाहिन्यांच्या परिसरात विकसित करण्यात आलेल्या ‘हरितवारी जलतिरी’ प्रकल्पाची अवस्था आता चिंताजनक बनली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील सायकल ट्रॅक आणि पदपथांवरील अनेक पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच आता विद्युत यंत्रणेच्या वार्षिक देखभालीसाठी महापालिका तब्बल १ कोटी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. ‘डी. बी. इन्फ्राटेक’ या कंपनीला हे काम देण्याचा प्रस्ताव असून, त्यावरून प्रकल्पाच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूंना दहा मीटरपर्यंतच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिले होते. त्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेचा उपयोग करून महापालिकेच्या जल अभियंता विभागाने सायकल ट्रॅक, उद्याने, पदपथ, सेवा रस्ते आणि विद्युत सुविधांची उभारणी केली. या उपक्रमाला ‘हरितवारी जलतीरी’ असे नाव देण्यात आले.
नियमित देखभालीकडे अपुरे लक्ष
मुलुंड ते सहार, घाटकोपर ते शीव, पवई ते साकीनाका आणि मुलुंड बी. आर. रोड ते एम. सी. सी. चौकी अशा चार भागांत मिळून सुमारे १८.६ किलोमीटर परिसरात हा प्रकल्प विकसित करण्यात आला. मात्र, प्रकल्प उभारल्यानंतर त्याच्या नियमित देखभालीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद असल्याने सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे.
पोलिस गस्त, सुरक्षा रक्षकांची होणार नियुक्ती
दरम्यान, काही ठिकाणी पदपथ बंद असल्याने आणि पुरेसा प्रकाश नसल्याने असामाजिक कृत्यांना वाव मिळत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. पोलिसांची गस्त, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि जागेचे संरक्षण याबाबतही उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे.
देखभालीसाठी देणार १२ महिन्यांचे कंत्राट
या पार्श्वभूमीवर विद्युत दिवे, वायरिंग आणि अन्य विद्युत सुविधांच्या देखभालीसाठी १२ महिन्यांचे कंत्राट देण्यात येणार आहे. महापालिकेचा कार्यालयीन अंदाज १ कोटी ६१ लाख ४४ हजार रुपये असताना डी. बी. इन्फ्राटेकने ३३.३३ टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. करांसह कंत्राटाची किंमत १ कोटी ३३ लाख १८ हजार ६२२ रुपये आहे. काम समाधानकारक असल्यास कंत्राटाचा कालावधी दरमहा वाढविण्याची तरतूदही आहे.