Mumbai : काँक्रीटीकरणासाठी ८,६१४ कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : काँक्रीटीकरणासाठी ८,६१४ कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे

मुंबईकरांना खड्डेमुक्त आणि दीर्घकालीन टिकाऊ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरु केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांना खड्डेमुक्त आणि दीर्घकालीन टिकाऊ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या टप्प्यात ३११ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ८६१४ कोटी ५५ लाख ५६ रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाला जानेवारी २०२७ पासून सुरुवात करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या शहरात सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचे पहिले आणि दुसरे टप्पे सुरू असून त्याअंतर्गत २१७९ रस्त्यांचे, म्हणजेच ७१५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १५८९ रस्त्यांवरील कामे पूर्ण झाली असून ३१६ रस्त्यांवरील कामे अंशतः पूर्ण झाली आहेत. एकूण प्रकल्पाची सुमारे ८० टक्के प्रगती झाली आहे.

पहिला टप्पा ३०७ किलोमीटरचा असून त्यास ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. दुसरा टप्पा ३७० किलोमीटरचा असून तो ऑक्टोबर २०२४ पासून सुरू आहे. या दोन्ही टप्प्यांतील उर्वरित कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तिसऱ्या टप्प्यात ३११ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच विविध सेवा वाहिन्यांच्या कामांमुळे अपूर्ण राहिलेल्या रस्त्याशेजारील २१५ किमीच्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूंच्या पट्ट्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरांतील रस्त्यांचा या टप्प्यात समावेश करण्यात आला असून सर्वाधिक कामे पश्चिम उपनगरांत प्रस्तावित आहेत.

तसेच पहिल्या टप्प्यातील शहर विभागातील सुमारे ३८० कोटी रुपयांची काही कामे दोन कंत्राटदारांकडून पूर्ण न झाल्याने त्यांचाही समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. सुरुवातीला या टप्प्याचा खर्च सुमारे १० हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र फेरआढाव्यानंतर तो कमी करून सुमारे ८ हजार ६१४ कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे. तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठीही साधारण दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी काँक्रीटचे पॅनेल तुटणे, रस्त्यांना तडे जाणे, रस्त्यांच्या कडेला खड्डे पडणे आणि चौकांमधील रस्त्यांचा पृष्ठभाग खराब होणे अशा समस्या कायम आहेत. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळांची अवस्थाही दयनीय आहे. त्यामुळे या सात निविदांच्या माध्यमातून केवळ मुख्य रस्त्यांवरच नव्हे, तर जोडरस्ते, अंतर्गत पॅसेज आणि जंक्शनच्या सुधारणेवरही भर देण्यात येणार आहे.

शहर विभागातील नऊ प्रभागांसाठी दोन निविदा

शहर विभागातील परिमंडळ एकच्या ए, बी, सी, डी आणि ई या पाच प्रभागांतील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १ हजार ११४ कोटी ३९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

पूर्व उपनगरांतील सहा प्रभागांवर लक्ष

पूर्व उपनगरांतील एल, एम/पूर्व आणि एम/पश्चिम या प्रभागांतील रस्त्यांच्या सुधारणेसाठी ९७८ कोटी ९७ लाख रुपयांची निविदा आहे, तर एन, एस आणि टी या प्रभागांतील रस्त्यांसाठी ८६५ कोटी ८१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने काँक्रीट रस्ते, अंतर्गत पॅसेज आणि त्यांच्या बाजूच्या पट्ट्यांची सुधारणा केली जाणार आहे.

पश्चिम उपनगरांसाठी सर्वाधिक ४,७३४ कोटी

पश्चिम उपनगरांतील रस्ते सुधारणांसाठी सर्वाधिक निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. एच/पश्चिम, एच/पूर्व आणि ई/पूर्व या प्रभागांसाठी १ हजार २७३ कोटी ५ लाख रुपये, तर के/पश्चिम, पी/दक्षिण आणि पी/उत्तर या प्रभागांसाठी २ हजार २१२ कोटी २१ लाख रुपयांची निविदा आहे. आर/दक्षिण, आर/मध्य आणि आर/उत्तर या प्रभागांतील रस्त्यांसाठी १ हजार २४९ कोटी ३१ लाख रुपयांचा अंदाजित खर्च आहे.

असा होणार खर्च

  • शहर विभाग : २,०३५ कोटी १६ लाख रुपये

  • पूर्व उपनगरे : १,८४४ कोटी ७९ लाख रुपये

  • पश्चिम उपनगरे : ४,७३४ कोटी ५८ लाख रुपये

  • एकूण : ८,६१४ कोटी ५४ लाख ५५ हजार ९६६ रुपये

एक व दोन टप्प्याचा खर्च १७ हजार कोटींचा

पहिला आणि दुसरा टप्पा मिळून सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पावर सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च होत असून तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील बहुतांश प्रमुख रस्ते कायमस्वरूपी काँक्रीटचे होणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FDA च्या कारवाईला डिजिटल पुराव्यांचे बळ; आठ ते नऊ महिन्यांत नवी यंत्रणा

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड; १० हजार रुपयांचा बोनस जाहीर

पदसंख्या १६ हजार करा! MPSC उच्चस्तरीय समितीची शिफारस

Mumbai : बोरिवली बांधकामप्रकरणी दोन अधिकारी कचाट्यात

गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’