शाळा, कॉलेज, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार; शेल्टरसाठी मुंबई बाहेरील जागेची पालिकेकडून चाचपणी  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

शाळा, कॉलेज, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार; शेल्टरसाठी मुंबई बाहेरील जागेची पालिकेकडून चाचपणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, कॉलेज, बसडेपो, रेल्वे स्थानक, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार करण्यासाठी मुंबई पालिका अॅक्शन प्लॅन तयार करत आहे.

Swapnil S

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, कॉलेज, बसडेपो, रेल्वे स्थानक, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार करण्यासाठी मुंबई पालिका अॅक्शन प्लॅन तयार करत आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उपलब्ध होत नसल्याने मुंबई बाहेरील जागेची चाचपणी सुरु केली आहे. ज्या संस्था भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी पुढे येतील, त्या संस्थांना कुत्रा जिवंत असेपर्यंत मुंबई महापालिकेच्या निकषांनुसार पैसे देणार आहे.

दरम्यान, मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम असून २०२५ या एकाच वर्षात तब्बल १ लाख ५४ हजार १७ जणांचे कुत्र्यांना घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. दरम्यान, ठाकरे सेनेचे नगरसेवक कैलासनाथ पाठक यांनी ६६-ब अंतर्गत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

२०३० पर्यंत रेबिजमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईत भटक्या व बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, उद्याने, शाळा, रुग्णालये आणि निवासी भागात भटक्या कुत्र्यांचा मुक्तसंचार असून नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याचे पाठक यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे मुंबईकरांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पालिकेने विशेष कृती आराखडा राबवावा अशी मागणीही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, शिवानी परब, सभागृह नेते गणेश खणकर, डॉ. सईदा खान, अजंता यादव, तृष्णा विश्वासराव, प्रकाश दरेकर, संध्या दोशी, प्रीती सातम, आशा मराठे, नितेश सिंह आदी सदस्यांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत प्रश्न मांडले. यावर महापौर रितू तावडे यांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

मुंबईबाहेर निवारा केंद्रांची चाचपणी!

मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी मालवणी, मुलुंड, ऐरोली आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत अशा सहा ठिकाणी नवीन शेल्टर होम सुरू करण्यात येणार आहे. मात्र याठिकाणी स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने याठिकाणी निवारा केंद्र उभारणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईबाहेर निवारा केंद्राची चाचपणी सुरू असल्याचे पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

दीड वर्षात ३७ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण!

  • पालिका क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ यांनी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीनुसार, ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या जागतिक सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये मुंबईत ९० हजार ७५७ भटके कुत्रे आहेत.

  • एप्रिल २०२४ ते २०२५ या कालावधीत पालिकेकडून २५ हजार २११ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. तर गेल्या आठ महिन्यांत १२ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले.

  • पालिका रुग्णालयांत सध्या १७ हजार अँटीरेबीज डोस उपलब्ध.

  • निर्बिजीकरण आणि लसीकरणावर साडेसहा कोटींच्या निधीचा खर्च.

  • पालिका क्षेत्रात १६० लसीकरण केंद्रे आहेत.

  • २६ पर्यंत १००२३५ भटके श्वानांना अँटीरेबीज लस दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर

मुलांना बेदखल करण्याचा पालकांना पूर्ण अधिकार; ज्येष्ठांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला

Mumbai : वांद्रे येथील फुटबॉल मैदानाबाबत याचिकेवर आज सुनावणी

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर