पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी 
मुंबई

पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी

जलवाहिन्यांची देखभाल, शुद्ध पाणीपुरवठा या सगळ्यावर मुंबई महापालिकेच्या जल विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी वाढवण्याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्याचा विचार केला तर पाणीपट्टीत ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत पालिकेत पुन्हा एकदा हालचाली सुरू आहेत.

Swapnil S

मुंबई : जलवाहिन्यांची देखभाल, शुद्ध पाणीपुरवठा या सगळ्यावर मुंबई महापालिकेच्या जल विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी वाढवण्याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्याचा विचार केला तर पाणीपट्टीत ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत पालिकेत पुन्हा एकदा हालचाली सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी तो सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, २०२२ पासून पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नाही.‌ त्यामुळे खर्चाची बाजू लक्षात घेता पाणीपट्टीत वाढ करणे गरजेचे असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाणीपट्टीत २०२२ नंतर वाढ नाही

मुंबईला १२० किलोमीटर अंतरावरून जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. कित्येक किलोमीटर लांबून पाणी वाहून आणि शुद्धीकरण करून मुंबईकरांना त्याचा पुरवठा केला जातो. या भल्यामोठ्या जलवाहिन्यांची देखभाल करणे, पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे आणि त्याचे वितरण आदी गोष्टींवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्यात २०२२ नंतर मुंबईच्या पाणीपट्टीत वाढ केलेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी २०२६ या वर्षात पाणीपट्टीत ६ ते ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी नवा प्रस्ताव

महापौर रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्यात आल्याचे भाषणातून जाहीर केले. मात्र आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सभागृहात तो सादर केला होता. मात्र विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर आवाज उठवला असता पाणीपट्टीत वाढ होणार नाही, याचा उल्लेख स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभागृहात केला आणि पाणीपट्टीतील वाढ त्यावेळी तूर्तास टळली.‌ मात्र पुन्हा एकदा नव्याने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

...अन्यथा १२५ कोटींवर सोडावे लागणार पाणी

मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर केला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत काही टक्के वाढ करण्यात येते. मात्र पालिका निवडणूक होईल या भीतीने २०२२ पासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी १२० किलोमीटर अंतरावरून ते आणावे लागते व त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. या खर्चाचा ताळमेळ राखला जावा यासाठी ८ टक्क्यांपर्यंत पाणीपट्टीत वाढ करण्यात येते. मात्र गेल्या चार वर्षांत पाणीपट्टीत वाढ न केल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यंदाही पाणीपट्टीत वाढ न केल्यास पालिका प्रशासनाला १०० ते १२५ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

Palghar : रुग्णालय कर्मचाऱ्यांना सेना कार्यकर्त्यांची मारहाण; गुन्हा दाखल

'उंच' नव्हे, 'उन्नत' गणेशोत्सव हवा...

डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त