मुंबई : गेले अनेक महिन्यांपासून चर्चेत आलेला सायन रेल्वे उड्डाणपूल अखेर गुरुवारपासून सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धारावीतून वळविण्यात आली आहे. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि एलबीएस मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग गाठण्यासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास अधिक खर्ची घालावा लागत आहे.
मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायन रेल्वे पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल गेले काही महिन्यांपासून बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर हा पूल आज बंद करण्यात आला. येत्या काही दिवसांत हा पूल पाडण्यात येऊन त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीतील बांधकाम रेल्वे तर महापालिकेच्या हद्दीतील बांधकाम महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ पुलाचे बांधकाम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.
हा पूल बंद केल्याने या मार्गावरील वाहतूक धारावीतील ६० फूट आणि ९० फूट रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर मार्गावर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. घाटकोपर सायन प्रवासासाठी नागरिकांना तब्बल पाऊण तास खर्ची घालावा लागत आहे.
असा करा प्रवास
-एलबीएसहून सायन दिशेकडे येणारी वाहतूक धारावी आगाराच्या रस्त्याहून माहीमकडे वळविण्यात आली आहे.
-माहीमच्या दिशेने म्हणजे धारावी टी जंक्शनकडे दाखल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दाखल होण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्पमधून जावे लागते.
-टी जंक्शन, माटुंगा लेबर कॅम्प असे अंतर पार करत सायन रुग्णालयाच्या दिशेने डॉ. आंबेडकर मार्गावर येता येते.
-सायनहून एलबीएकडे परतीचा प्रवासही याच दिशेने करावा लागतो.
-धारावीत स्काय वॉक असला तरी लोक रस्त्यावरून प्रवास करत असल्याने आणि वाहने पार्किंग असल्याने नागरिकांना कोंडीतून प्रवास करावा लागत आहे.
इथे होते कोंडी
-कल्पना सिनेमासमोर रस्त्याच्या मधोमध हाती घेण्यात आलेल्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे पंधरा मिनिटे कोंडी होते.
-धारावी टी जंक्शन सर्व दिशांनी एकाच ठिकाणी दाखल होणाऱ्या वाहनांमुळे कोंडीचा सामना करावा लागतो.
-माटुंगा लेबर कॅम्पमध्ये रस्ता अरुंद आहे. त्यामुळे सायन रुग्णालयाच्या बस थांब्यापर्यंत हा संपूर्ण रस्ता कोंडीत अडकतो.