मुंबई / प्रतिनिधी
राज्य प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी सध्या उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त आहेत. मंत्रालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत पावसाचे घाण पाणी मिसळले गेल्याने येथील कर्मचारी-अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाधा झाली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अधिकारी-कर्मचारी पोटदुखीच्या आजाराने हैराण झाले आहेत. परिणामी उलटी, जुलाबावर उपचार घेण्यासाठी मंत्रालय दवाखान्यात आजारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची अक्षरश: रांग लागली आहे.
मंत्रालयातील दूषित पाण्याने तब्बेत बिघडल्याच्या तक्रारी सध्या मंत्रालयात ऐकू येत आहेत. मोबाईलवरील अधिकाऱ्यांच्या व्हाट्स ऍप ग्रुपवर सध्या याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. मंत्रालयातील 'बँक ऑफ महाराष्ट्र' च्या शाखेसमोर जमिनीखाली पाण्याची साठवणूक टाकी आहे. या टाकीतील पाणी वरच्या टाकीत जाऊन त्याचा पुरवठा मंत्रालय मुख्य इमारतीला होतो. जमिनीखालच्या टाकीत पावसाचे पाणी गेल्याने मंत्रालयातील पाणी दूषित झाले. हे दूषित पाणी प्यायल्याने बहुतेकांना घरी गेल्यानंतर उलटी, जुलाबाचा त्रास सुरु झाला. मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनीही दूषित पाण्याचा फटका बसला आहे.
जुलाब आणि पोटदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्ण कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर मंत्रालयातील डॉक्टरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पाण्याचे नमुने तापसण्याबाबत पत्र दिले होते. याबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जुलाब आणि तापाने त्रस्त असलेले अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपचार करून घेण्यासाठी येत असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.
बांधकाम विभाग जबाबदार?
मंत्रालयातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी विभागाने योग्य काळजी न घेतल्याने ही समस्या उद्भल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणे हा गंभीर प्रकार असल्याची भावना व्यक्त करत दूषित पाण्याबद्दल कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली आहे.
मंत्रालय हे राज्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे मुख्यालयात दूषित पाण्याची समस्या निर्माण होणे हे गंभीर आहे. सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी. या समस्येच्या संदर्भात महासंघाच्या वतीने उद्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात येणार आहे.समीर भाटकर, सरचिटणीस, राजपत्रित अधिकारी महासंघ
‘मंत्रालयातील पाण्याच्या टाक्यांची दोन महिन्यांपूर्वी स्वच्छता करण्यात आली आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार आल्यानंतर विभागाने तातडीने उपाययोजना करून ही समस्या दूर केली. पावसाच्या पार्श्वभूमी स्वच्छ पाणी पुरवठयासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे’विद्याधर पाटसकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग