मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पासाठी परिसरातील तब्बल १२८ झाडे प्रभावित होणार आहेत. यापैकी ५६ झाडे तोडण्यात येणार असून ७२ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने मुंबई महापालिकेच्या प्राधिकरणाकडे वृक्ष परवानगी मागितली आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
स्थानकाचा सीएसएमटी पुनर्विकास अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने करण्यात येणार आहे. या कामासाठी परिसरातील काही झाडे हटविणे आवश्यक असल्याचे रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने प्रस्तावात नमूद केले आहे.
१२८ झाडे पुनर्विकासाच्या कामामुळे प्रभावित
झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे संबंधित परिसराची पाहणी केली. या पाहणीत उद्यान विद्या सहाय्यक काशिनाथ खाडे, सहाय्यक उद्यान अधीक्षक सुदर्शन आवारे आणि उपउद्यान अधीक्षक प्रवीण गोसावी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष पाहणीत संबंधित भूखंडावर एकूण २४२ झाडे आढळली. त्यापैकी १२८ झाडे पुनर्विकासाच्या कामामुळे प्रभावित होणार असल्याचे स्पष्ट झाले.
अशी होणार वृक्षतोड
या आधी याच भूखंडावरील ६६ झाडे तोडण्यास, १८० झाडांचे पुनर्रोपण करण्यास आणि २५६ झाडे आहे त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान जागेवरच सुरक्षित ठेवण्याचे ठरवण्यात आलेल्या २५६ झाडांपैकी १४ झाडे संबंधित भूखंडावर आढळली नाहीत.
आणखी किती झाडांची कत्तल होणार
आता नव्याने ५६ झाडे तोडण्यास आणि ७२ झाडांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी मागण्यात आली आहे. सीएसएमटीचा पुनर्विकास हा मुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असला तरी विकासकामांच्या नावाखाली किती झाडांची कत्तल होणार आणि पुनर्रोपण केलेल्या झाडांचे प्रत्यक्षात किती संवर्धन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.