मुंबई

Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; महिलेला मालमत्ता विकायलाही भाग पाडले

मुंबईत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५८ वर्षीय महिलेकडून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट पोलिस अधिकाऱ्यांनी मनी लॉन्डरिंग प्रकरणाची भीती दाखवत महिलेला मालमत्ता विकून पैसे देण्यास भाग पाडले. सायबर गुन्हेगारांच्या नव्या युक्त्यांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेला सायबर फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. स्वतःला पोलिस अधिकारी सांगणाऱ्या भामट्यांनी 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव रचत तब्बल ६० लाख रुपये उकळले. खोट्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाची भीती दाखवत तिला मालमत्ता विकून पैसे देण्यास भाग पाडण्यात आले.

गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असून, 'डिजिटल अरेस्ट'सारखी कोणतीही अधिकृत प्रक्रिया अस्तित्वात नसल्याचे सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही भामटे नागरिकांना भीती दाखवून जाळ्यात ओढत आहेत.

बनावट पोलिसांचा कॉल; 'डिजिटल चौकशी'च्या नावाखाली धमक्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीच्या निधनानंतर साधारण महिनाभराने हा प्रकार सुरू झाला. तिला एका व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल आला. त्याने स्वतःला दिल्ली पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले आणि तिच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यातून १.५ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंगचा व्यवहार झाल्याचा आरोप केला.

महिलेने अधिकारक्षेत्राबाबत प्रश्न विचारताच कॉल दुसऱ्या व्यक्तीकडे वळवण्यात आला. त्याने स्वतःला मुंबई पोलिसांचा वरिष्ठ अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर धमक्यांचा सूर वाढवत तिला अटक होण्याची भीती दाखवली आणि ‘डिजिटल चौकशी’च्या नावाखाली मानसिक दबाव आणला.

मालमत्ता विकायला भाग पाडले

मृत पतीने घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या या महिलेला, कर्ज फेडल्यास तिची निर्दोषता सिद्ध होईल, असे भामट्यांनी पटवून दिले. इतकेच नव्हे, तर तिच्या मालमत्तेची माहितीही त्यांनी मिळवली आणि ती विकण्यास सांगितले.

खरेदीदार न मिळाल्याने तिने आपले सोनं विकून ३५ लाख रुपये उभे केले. भामट्यांनी पाठवलेल्या व्यक्तीने तिच्या घराजवळ येऊन ही रक्कम घेतली. काही दिवसांनी तिने आणखी २५ लाख रुपये जमा केले, जे दुसऱ्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष येऊन घेण्यात आले.

उशिरा झाली जाणीव, पोलिसांत तक्रार

काही काळानंतर संबंधित ‘अधिकारी’ अचानक संपर्कात येणं बंद झाले. मात्र त्याआधीच वारंवार आणखी पैशांची मागणी होत असल्याने महिलेचा संशय बळावला होता. अखेर फसवणुकीची जाणीव होताच तिने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोणतीही कायदा अंमलबजावणी संस्था फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैसे मागत नाही. नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे आणि संशयास्पद कॉल्सची तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन