मुंबई

मुंबईत बुडत्यास ‘ड्रोन’चा आधार! बुडणाऱ्याचा शोध घेऊन ड्रोन करणार सुखरूप सुटका

Swapnil S

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईच्या सहा चौपाट्यांवर विशेषत: पावसाळ्यात समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता ‘एक्वा आय सर्च मशीन’ तैनात करण्यात येणार आहे. या मशीनच्या सहाय्याने बुडणारी व्यक्ती वेळीच ट्रॅक होणार असून, २०० किलो वजन क्षमता असलेले अत्याधुनिक ड्रोन बुडणाऱ्या व्यक्तीला पुन्हा समुद्रकिनारी सुखरूप आणणार आहेत. यासाठी ड्रोन आणि ‘एक्वा आय मशीन’ चौपाट्यांवर तैनात करण्यात येणार आहेत. तूर्तास ३ ड्रोन यासाठी घेण्यात येणार आहेत.

समुद्रकिनारी विशेषतः पावसाळ्यात पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खोल पाण्यात जातात. मात्र, अनेकदा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड तैनात असतात. परंतु, लाईफ गार्डच्या सूचनेकडे कानाडोळा करत अतिउत्साही पर्यटक खोल पाण्यात जातात. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

समुद्रकिनारी चौपाट्यांवर बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी लाईफ गार्ड व अग्निशमन दलाच्या जवानांना दिवसरात्र एक करावी लागते. तरीही अनेकदा बुडालेल्या व्यक्तीचा शोध लागत नाही. त्यामुळे बुडणाऱ्या व्यक्तीला वेळीच ट्रॅक करण्यासाठी ‘सर्च मशीन’ चौपाटी व समुद्रकिनारी तैनात करण्यात येणार आहेत. ५० मीटर खोल आणि ४२ हजार चौरस फुटांपर्यंत बुडणाऱ्या व्यक्तीचा या सर्च मशीनने वेळीच शोध घेणे शक्य होणार आहे.

समुद्रकिनारी चौपाट्यांवर बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लाईफ गार्ड व अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा पावसाळ्यात ‘सर्च ऑपरेशन’ करणे अशक्य होते. परंतु, ‘एक्वा आय मशीन’ अर्थात ‘अंडर वॉटर सर्च मशीन’मुळे बुडणाऱ्या व्यक्तीचा वेळीच शोध घेणे शक्य होणार आहे. तसेच बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध लागताच २०० किलो वजन पेलण्याची क्षमता असलेला ड्रोन बुडणाऱ्या व्यक्तीला पुन्हा समुद्रकिनारी सुखरूप आणणार आहे. त्यामुळे ड्रोन आणि ‘एक्वा आय मशीन’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान अग्निशमन दलासाठी उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी व्यक्त केला.

ड्रोनचा होणार असा वापर

- रिमोट कंट्रोल हाताळणार

- २०० किलो वजनाची क्षमता

- ८०० किमी रेंजपर्यंत जाऊन बुडणाऱ्याला परत आणणार

- ताशी वेग जाताना १६ ते १८ किमी, येताना १२ ते १४ किमी

- सहा चौपाट्यांवर सहा ड्रोन तैनात करणार

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?