मुंबई : मुंबईतील ४८ हजार पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप केले आहे. मात्र पात्र ३ हजार १७६ फेरीवाल्यांचे निधन झाले असून त्यांच्या वारसांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी धोरण निश्चित करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले.
विधी समितीच्या बैठकीत ठाकरे सेनेचे सदस्य सुहास वाडकर यांनी फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ९९ हजार फेरीवाले असल्याचे समोर आले आहे. यात पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. क्यूआर कोड आधारित ओळखपत्र मिळावे यासाठी पात्र फेरीवाल्यांची अर्ज केले होते.
त्यानंतर महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्यासह विधी समिती अध्यक्षा म्हणून पात्र ४८ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. मात्र पात्र फेरीवाल्यांपैकी ३१७६ फेरीवाल्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत फेरीवाल्यांच्या कुटुंबातील वारसाला क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. परंतु यासाठी धोरण निश्चित करणे गरजेचे असून धोरण निश्चित करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले.