मुंबई : दुकाने, आस्थापनांवर मराठी पाटी ठळकपणे दिसतील, अशा स्वरूपात नसतील तर मुंबई पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. आता मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरूपात मराठी पाट्या नसतील तर थेट कारवाई करण्याचा इशारा विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिला आहे.
आस्थापनांवर देवनागरी लिपीतील मराठी नामफलक ठळक अक्षरांत लावणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही अनेक व्यावसायिक आस्थापनांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून आता शहरातील पंचतारांकित हॉटेलांच्या नामफलकांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मराठी नामफलक आढळून न आल्यास संबंधित हॉटेलांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिक्षा कारकर यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, देवनागरी लिपीतील मराठी नामफलक लावण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्यानंतर मुंबई महापालिकेने २८ नोव्हेंबर २०२३ पासून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकाने व आस्थापनांविरोधात कारवाई सुरू केली होती. मुंबईत दुकाने, हॉटेल्स, चित्रपटगृहे आणि अन्य व्यावसायिक आस्थापना मिळून सुमारे १० लाख ८३ हजार २५१ आस्थापना आहेत.
मराठी नामफलकांबाबत नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने १४ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान अनेक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टप्पा राबविण्याबाबत विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी दुकाने व आस्थापना विभागाला पत्र पाठवून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांच्या नामफलकांची स्वतंत्र पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘या’ पंचतारांकित हॉटेलची होणार तपासणी
या मोहिमेअंतर्गत कुलाब्यातील हॉटेल ताज, नरीमन पॉइंटमधील ऑबेरॉय, ट्रायडंट, सेंट रेजिस, जेडब्ल्यू मेरियट व वांद्रे येथील हॉटेल ताज यांसह मुंबईतील अन्य पंचतारांकित हॉटेलची तपासणी करण्याचे निर्देश दीक्षा कारकर यांनी दुकाने व आस्थापना विभागाला दिले आहेत.