Mumbai : मृतांचा आकडा आठवर! घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली; मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा (Photo-X)
मुंबई

Mumbai : मृतांचा आकडा आठवर! घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली; मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा

घाटकोपर पश्चिमेतील अशोकनगर परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील अशोकनगर परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. तब्बल ३० तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर गुरुवारी शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. सद्दाम वझीर अली खान (२८) असे मृताचे नाव असून, त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बुधवारी पहाटे सुमारे ३.३८ वाजता डोंगरावरील दरड आणि मोठे दगड घरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर सद्दाम खान बेपत्ता असल्याचे स्थानिकांनी बचाव पथकांना सांगितले होते. खान हा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विकेत यादवचा मित्र होता. दोघेही विकेतचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

खानचा मृतदेह मोठ्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे आणि मृतदेह बाहेर काढणे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान ठरले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. मोठा दगड अत्यंत अस्थिर असल्याने ती हलवताना बचाव पथकातील जवानांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे यंत्रसामग्री घटनास्थळी नेता येत नसल्याने दगड हाताने फोडण्याचे काम करण्यात आले.

एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट सारंग कुर्वे यांनी सांगितले की, स्थानिकांकडून खान अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. अखेर मोठ्या दगडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला.

एनडीआरएफच्या पथकाने ‘जेस्सी’ या श्वानासह मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या समन्वयाने सुमारे ३० तास ढिगारा उपसण्याचे आणि शोधकार्य केले. गुरुवारी दुपारी १.२५ वाजता परिसराची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर आणखी कोणी ढिगाऱ्याखाली अडकलेले नसल्याची खात्री झाल्यावर शोधमोहीम थांबविण्यात आली.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

१०० मीटर परिसर रिकामा करण्याची सूचना

घाटकोपर येथील चिराग नगर येथे बुधवारी पहाटे ३.३८ वाजता दरड कोसळली आणि या दुर्घटनेत ८ जण दगावले. या परिसरात १०० मीटर परिसर रिकामा करण्याची सूचना केली आहे. जवळच असलेल्या मोहिली व्हिलेज स्कूलमध्ये त्यांच्यासाठी निवारा केंद्र उपलब्ध केले आहे. स्थलांतरित होणाऱ्या ७० रहिवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल जाधव यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम