मुंबई : ग्राहकांच्या अधिकार-हक्कांसाठी काम करणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीने अटकेपार झेंडा रोवला आहे. या संस्थेला जिनिव्हातील संयुक्त राष्ट्रे व्यापार विकास परिषदेत (यूएनसीटीएडी) ग्राहक कायदे, धोरण आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रातील "विशेष निरीक्षक" म्हणून कायमस्वरूपी स्थान देण्यात आले आहे. हा बहुमान मिळवणारी मुंबई ग्राहक पंचायत ही जगातील एकमेव स्वयंसेवी ग्राहक संस्था आहे.
जिनिव्हात संयुक्त राष्ट्र व्यापार मंडळाच्या (यूएन ट्रेड बोर्ड) २३ आणि २४ नोव्हेंबरला झालेल्या सभेत मुंबई ग्राहक पंचायतीला विशेष निरीक्षक हा बहुमान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांना एका पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या १९८५च्या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये २०१५ मध्ये कालानुरुप आमूलाग्र बदल घडवून आणण्यात ॲड. देशपांडे आणि त्यांच्या चमूने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नाही तर या सुधारित ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांची संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमधे अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणाही निर्माण करण्यात आली. ॲड. देशपांडे हे त्या देखरेख यंत्रणेचे शिल्पकार आहेत. सन २०१६ पासून जिनिव्हा येथे दरवर्षी जुलैमध्ये या यंत्रणेची वार्षिक परिषद संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेतर्फे घेण्यात येते. या वार्षिक परिषदांतही ॲड. शिरीष देशपांडे आणि त्यांची टिम नियमितपणे अभ्यासपूर्ण योगदान देत आली आहे.
गेल्याच वर्षी "जागतिक ऑनलाइन तंटा निवारण यंत्रणे"चा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेने स्वीकारला आणि त्याबाबत इच्छुक सदस्य राष्ट्रांकडून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव मागवले आहेत. यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा आणि या जागतिक तंटा निवारणाचे मुख्य केंद्र मुंबईत असावे यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आजही प्रयत्नशील आहे, संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेच्या अभ्यासपूर्ण कार्याची दखल
ग्राहक पंचायतीने गेली १४ वर्षे सातत्याने आणि चिकाटीने संयुक्त राष्ट्रे व्यापार विकास परिषदेबरोबर अभ्यासपूर्ण कार्य केले. संस्थेला मिळालेला बहुमान त्या कार्याचीच पोचपावती आहे, ॲड. देशपांडे यांना या प्रदीर्घ कालावधीत शुभदा चौकर, वसुंधरा देवधर, वर्षा राऊत, अर्चना सबनीस, शर्मिला रानडे, ॲड. पूजा जोशी-देशपांडे, अनुराधा देशपांडे आणि नेहा जोशी या उत्साही कार्यकर्त्यांचे सक्रीय सहकार्य लाभले.
या बहुमानामुळे संस्था म्हणून जागतिक स्तरावर मुंबई ग्राहक पंचायतीची जबाबदारी आणखी वाढली आहे.ॲड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत